ना शारीरिक, ना भावनिक बंध;एकाच छताखाली जोडपी राहतात ‘मूक घटस्फोट’ घेतल्यासारखी

By नम्रता फडणीस | Updated: May 15, 2025 13:00 IST2025-05-15T12:59:31+5:302025-05-15T13:00:51+5:30

- ‘मूक घटस्फोटा’चे प्रमाण जवळपास ५० ते ६० टक्क्यांपर्यंत

pune news couples living under the same roof are like having a silent divorce | ना शारीरिक, ना भावनिक बंध;एकाच छताखाली जोडपी राहतात ‘मूक घटस्फोट’ घेतल्यासारखी

ना शारीरिक, ना भावनिक बंध;एकाच छताखाली जोडपी राहतात ‘मूक घटस्फोट’ घेतल्यासारखी

पुणे : लग्नानंतर दोघांनी बरीच वर्षे एकमेकांच्या सहवासात सुखात घालवली. संसाराच्या वेलीवर उमलेली कळी पाहता पाहता १७ वर्षांची झाली. सर्व छान सुरळीत सुरू होतं. अचानक आनंदात विरजण पडलं आणि दोघांमधील संवाद कमी होऊ लागला. एकाच छताखाली राहून दोघेही अनोळखी व्यक्तीसारखे राहू लागले.

ना भावनिक, ना शारीरिक, कोणतंच बंध त्यांच्यात उरलं नाही. दोघांनी एकमेकांशी संवाद वाढवण्याचा कधी प्रयत्नही केला नाही. केवळ मुलीसाठी त्यांच्यात उरलं एक व्यावहारिक नातं! हे जरी एक प्रातिनिधिक उदाहरण असले तर आज अशाप्रकारे एकाच छताखाली पती-पत्नी ‘मूक घटस्फोट’ (सायलेंट डिव्होर्स) घेतल्यासारखी जगत आहेत. वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार दाम्पत्यामधील ‘मूक घटस्फोटा’चे प्रमाण हे जवळपास ५० ते ६० टक्के इतके असून, हळूहळू या ‘मूक घटस्फोटा’ची परिणती घटस्फोटामध्ये होऊ लागली आहे. यामुळे लग्नव्यवस्था मोडकळीस येण्याची भीती आहे.

समाजात अनेक जोडपी अशी आहेत की, जी प्रथमदर्शी आदर्श जोडपी वाटतात. त्यांच्यात ‘मूक घटस्फोट’ घेतल्यासारखे काहीतरी सुरू आहे, याचा पत्ता देखील कुणाला लागत नाही. जोडप्यांना आपल्यात सुरू असलेला विसंवाद किंवा संघर्षाचे प्रदर्शन इतरांसमोर करायचे नसल्यामुळे त्यांच्यात सर्वकाही ‘गुडीगुडी’ चालले असल्याचा त्यांच्याकडून दिखावा केला जातो; पण प्रत्यक्षात त्या जोडप्यांमध्ये पती-पत्नीसारखे काहीच नाते नसते. केवळ मुलांसाठी ते एकत्र राहत असतात. मुले मोठी झाली की, मग घटस्फोट घेण्याचा निर्णय ही जोडपी घेतात. अनेकदा मोबाइलचा अतिवापर, विवाहबाह्य संबंध ही यामागील कारणे असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
‘मूक घटस्फोट’ म्हणजे काय?

मूक घटस्फोट म्हणजे कायदेशीररीत्या विवाहित; परंतु भावनिकदृष्ट्या एकमेकांपासून वेगळे असण्याची स्थिती. नातेसंबंधातील ही विभक्तता कुटुंबातील इतर सदस्यांसह विशेषतः मुलांवर खोल मानसिक, भावनिक परिणाम करते. ‘मूक घटस्फोटा’च्या मार्गावर असलेली जोडपी ‘अर्थ’पूर्ण संवाद टाळतात. ही जोडपी घरगुती कामे, आर्थिक बाबी किंवा पालकत्व याबद्दल व्यावहारिकपणे बोलत राहतात; पण कधीही भावना, विचार किंवा वैयक्तिक समस्यांवर चर्चा करत नाहीत. वैवाहिक जीवनातील मूक घटस्फोटाकडे वाटचाल करत असताना, जोडपी समांतर जीवन जगू लागतात. त्यांना दैनंदिन जीवनात किंवा वारंवार होणाऱ्या कामांमध्ये फारसे स्वारस्य नसते.
 

मूक घटस्फोटाची चिन्हे

१) संवाद तुटणे

२) भावनिक आणि शारीरिक जवळीक कमी होणे.

३) उदासीनता आणि भावनिक सुन्नता

४) समांतर जीवन जगू लागणे.

‘मूक घटस्फोटा’चे प्रमाण हे जवळपास ५० ते ६० टक्के इतके आहे. अशी अनेक जोडपी घटस्फोट घेण्यासाठी येत आहेत; पण अशा जोडप्यांचे आम्ही सर्वप्रथम समुपदेशन करतो. कोणतेही नाते हे ‘लेट गो’ करण्यासारखे नसते. प्रत्येक नात्यात थोडीफार तडजोड ही करावीच लागते. आपल्यातील संवाद वाढविणे हे जोडप्यांच्या हातात आहे. जोडप्यांनी एकमेकांना अधिक वेळ देण्याबरोबरच छान ट्रीप किंवा एकत्र मूव्ही बघणे अशा गोष्टींचा प्लॅन करणे आवश्यक आहे. तरच नाते सुधारेल  - ॲड. नीता भवर 

Web Title: pune news couples living under the same roof are like having a silent divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.