‘पुरंदर’साठी पाच दिवसांत ८०२ एकर जमिनीची मोजणी पूर्ण, मोजणी पथकाची संख्या वाढविली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 16:49 IST2025-10-01T16:47:36+5:302025-10-01T16:49:12+5:30
पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी आणि वनपुरी या सात गावांच्या जागेवर विमानतळ उभारण्यात येणार

‘पुरंदर’साठी पाच दिवसांत ८०२ एकर जमिनीची मोजणी पूर्ण, मोजणी पथकाची संख्या वाढविली
पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी मोजणीचे काम २६ सप्टेंबरपासून सुरू असून, गेल्या पाच दिवसांत ३२१ हेक्टर अर्थात ८०२ एकर जमिनीची मोजणी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी आणि वनपुरी या सात गावांच्या जागेवर विमानतळ उभारण्यात येणार आहे. यासाठी तीन हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. जमीन मोजणीपूर्वी ३,२२० जणांनी २,८१० एकर जमिनीची, म्हणजेच सुमारे ९३ टक्के शेतकऱ्यांनी, संपादनासाठी संमतिपत्रे दिली आहेत. त्यानंतर आता प्रत्यक्ष जमीन मोजणीला २६ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. यासाठी ड्रोनचा वापर केला जात असून, प्रत्यक्ष मोजणीसुद्धा केली जात आहे. पहिल्या पाच दिवसांतच ८०२ एकर जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे.
जमीन मोजणीसाठी सुरुवातीला पाच पथके तयार करण्यात आली होती. आता त्यात आणखी एक पथक वाढविण्यात आले असून, सहा पथकांच्या माध्यमातून मोजणी केली जात आहे. मोजणीसाठी महसूल, वन, सार्वजनिक बांधकाम, कृषी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुरंदर उपसा सिंचन आणि इतर शासकीय विभागांतील अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. ही मोजणी शांततेत पार पडत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिली गेली आहे. मोजणीदरम्यान फळझाडे, शेतविहीर, पाइपलाइन आदींचे मूल्यांकन देखील करण्यात येत आहे. पुढील २० दिवस मोजणीचे काम सुरू राहणार आहे.
मोजणीवेळी उपस्थित राहावे
स्थानिक शेतकरी, तसेच बाहेरगावी राहणाऱ्या शेतकऱ्यांनी मोजणीच्या वेळी उपस्थित राहावे. त्यांच्या जमिनीत असणाऱ्या फळझाडांसह मालमत्तेची माहिती द्यावी, जेणेकरून मोजणीत अचूकता आणि पारदर्शकता राहील, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.