‘परभणी शक्ती’ ज्वारी बियाणांवरून वाद;भोर तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 15:35 IST2026-02-27T15:34:41+5:302026-02-27T15:35:50+5:30

- एकरी ४० हजार भरपाईची मागणी 

pune news controversy over Parbhani Shakti sorghum seeds; Farmers suffer huge losses in Bhor taluka | ‘परभणी शक्ती’ ज्वारी बियाणांवरून वाद;भोर तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

‘परभणी शक्ती’ ज्वारी बियाणांवरून वाद;भोर तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

भोर : महाबीजमार्फत कृषी विभागाच्या वतीने भोर तालुक्यातील २४ गावांतील शेतकरी गटांना चालू रब्बी हंगामासाठी २४० एकर क्षेत्रावर पेरणीसाठी २४ क्विंटल ‘परभणी शक्ती’ ज्वारी बियाणांचे वाटप करण्यात आले होते. मात्र बियाणांची वाढ समाधानकारक न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्तांना एकरी ४० हजार रुपये भरपाई देण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांनी केली आहे.

बाठे यांनी आमदार शंकर मांडेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील चिखलगाव, वेनवडी, वडगाव डाळ, कर्नावड, कारी, ससेवाडी, कुरुंगवडी, वागजवाडी, पांडे तसेच केंजळ आदी गावांतील शेतकऱ्यांनी सहायक कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार ज्वारीची पेरणी केली. सुरुवातीला उगवण झाली; मात्र दोन-अडीच महिने उलटूनही ताटव्याची वाढ योग्य प्रकारे झाली नाही. परिणामी ज्वारीचे उत्पादन तर दूरच, जनावरांसाठी कडबाही मिळणार नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

मोठ्या अपेक्षेने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची आशा होती; मात्र बियाणे निकृष्ट निघाल्याने मोठे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. आधीच कर्जबाजारीपणामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे बोगस बियाणांमुळे आणखी हाल झाले असल्याचे बाठे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

दरम्यान, तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी यांनी सांगितले की, काही गावांत ज्वारीची वाढ समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आले आहे. अधिक काळ पाऊस राहिल्याने पेरणी उशिरा झाली आणि खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे वाढ खुंटली. याबाबत महाबीजला कळविण्यात आले असून, नुकसानभरपाईसंदर्भात पुढील कार्यवाही सुरू आहे.

जिल्हा व्यवस्थापक पुरुषोत्तम फाटे यांनी सांगितले की, मागील वर्षीही भोर व राजगड तालुक्यात ‘परभणी शक्ती’ वाणाचे वितरण झाले होते. यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे खोडकीड व मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, बियांमध्ये दोष नसल्याचे प्राथमिक निरीक्षणात आढळले आहे. तरीही शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याने अहवाल अकोले येथील मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. या संदर्भात आमदार शंकर मांडेकर यांनी सांगितले की, प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून, चौकशी करून हा प्रश्न विधानसभेत मांडला जाईल.

Web Title : परभणी शक्ति बीज विवाद: भोर तालुका में किसानों को नुकसान

Web Summary : महाराष्ट्र के भोर में 'परभणी शक्ति' ज्वार के घटिया बीज से किसानों को नुकसान। प्रभावित किसान मुआवजे की मांग कर रहे हैं, कृषि मार्गदर्शन के बावजूद फसल की खराब वृद्धि का हवाला दे रहे हैं। अधिकारियों ने मुद्दों को स्वीकार किया, संभावित कारणों की जांच की, और कार्रवाई का वादा किया, जिससे राज्य विधानसभा में चिंता बढ़ गई।

Web Title : Parbhani Shakti Seeds Controversy: Farmers Suffer Losses in Bhor Taluka

Web Summary : Farmers in Bhor, Maharashtra, face losses due to substandard 'Parbhani Shakti' sorghum seeds. Demanding compensation, affected farmers cite poor crop growth despite agricultural guidance. Officials acknowledge issues, investigate potential causes, and promise action, raising concerns in the state assembly.