उरुळी कांचन ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष निवडीवरून गोंधळ; पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 16:13 IST2025-09-18T16:13:03+5:302025-09-18T16:13:21+5:30

सरपंच ऋतुजा अजिंक्य कांचन यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतच्या नव्या इमारतीसमोर पार पडलेल्या या सभेत तंटामुक्ती अध्यक्ष निवड प्रक्रियेमुळे वातावरण तापले, आणि पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हस्तक्षेप करावा लागला.

pune news controversy over election of Tantamukti president in Uruli Kanchan Gram Sabha; Police had to intervene | उरुळी कांचन ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष निवडीवरून गोंधळ; पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप

उरुळी कांचन ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष निवडीवरून गोंधळ; पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप

उरुळी कांचन : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आयोजित विशेष ग्रामसभेत उरुळी कांचन (ता. हवेली) येथे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून मोठा गदारोळ झाला. सरपंच ऋतुजा अजिंक्य कांचन यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतच्या नव्या इमारतीसमोर पार पडलेल्या या सभेत तंटामुक्ती अध्यक्ष निवड प्रक्रियेमुळे वातावरण तापले, आणि पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हस्तक्षेप करावा लागला.

ग्रामसभेच्या सुरुवातीला नियमित विषयांवर चर्चा झाली. मागील सभेचा वृत्तांत, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान समिती, आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामस्तरीय समिती स्थापनेवर चर्चा झाली. ग्राम स्वराज सॉफ्टवेअर वापरण्याचा ठराव बहुमताने संमत करण्यात आला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, कालवा अस्तरीकरण, स्वच्छता यासह विविध विषयांवर ठराव मंजूर झाले. तसेच, मतदार यादीतील १४५० नावे हरकतींमुळे कमी करण्यात आल्याबाबत ही चर्चा झाली, आणि यावर आरोप-प्रत्यारोप झाले.

ग्रामसभेचा मुख्य वाद महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून उद्भवला. माजी अध्यक्ष अलंकार कांचन यांनी राजीनामा दिल्याने नवीन अध्यक्ष निवडण्याचा मुद्दा उपस्थित झाला. चार अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी दोन अर्ज कागदपत्रांच्या अभावी अपात्र ठरले. उर्वरित दोन उमेदवार, योगेश कांचन आणि महादेव बापू कांचन, यांच्या नावांवर चर्चा झाली.

ग्रामसेवक प्रकाश गळवे यांनी शासकीय नियमांचे वाचन करत पोलिस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता अधोरेखित केली. त्यानंतर बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न झाले, परंतु ते निष्फळ ठरले. यामुळे सरपंच ऋतुजा कांचन यांनी सर्वाधिकाराने महादेव बापू कांचन यांची अध्यक्षपदी निवड जाहीर केली.

 ग्रामस्थांचा आक्षेप आणि गोंधळ

या निर्णयाला काही ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेतला आणि लोकशाही पद्धतीने निवड न झाल्याचा आरोप केला. संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसेवक कार्यालयावर धडक देत घोषणाबाजी केली, ज्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उरुळी कांचन पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण कांबळे, बापूसाहेब म्हत्रे, प्रवीण चौधर, सुजाता भुजबळ, सातव, जगताप यांच्यासह मोठ्या पोलिस बंदोबस्ताने परिस्थिती नियंत्रणात आणली.
 

आजची निवड प्रक्रिया सरपंचांनी लोकशाही पद्धतीने न करता मनमानीने केली. माझा अर्ज का बाद झाला याचा खुलासा व्हायला हवा. ग्रामसभेचा हक्क भंग झाला आहे, आणि आम्ही याविरोधात कायदेशीर लढाई लढणार आहोत.  - योगेश कांचन, तंटामुक्ती अध्यक्षपदाचे उमेदवार 

 

 मी स्वतः राजीनामा दिला होता आणि ही निवड पारदर्शकपणे व्हावी अशी मागणी केली होती. मात्र, सरपंचांनी बेकायदेशीरपणे निवड जाहीर केली. ग्रामसेवकांनी बंद दाराआड उमेदवारांशी चर्चा केली, याचा खुलासा व्हायला हवा. ग्रामस्थांचे म्हणणे न ऐकता सभा संपवण्यात आली. -अलंकार कांचन, माजी तंटामुक्ती अध्यक्ष  
 

‘झालेल्या ग्रामसभेचा वृत्तांत जसा आहे तसा सादर करणार आहे. तंटामुक्ती अध्यक्षपदाचा निर्णय सरपंचांनी जाहीर केला आहे. - प्रकाश गळवे, ग्रामसेवक 
 

‘महादेव बापू कांचन यांची निवड सर्वानुमते आणि गावात वाद टाळण्यासाठी माझ्या सर्वाधिकाराने करण्यात आली. त्यांनी यापूर्वी भैरवनाथ उत्सव समितीवर चांगले काम केले आहे. बॅनर फाडण्याचा अनुचित प्रकार घडायला नको होता. मागील तंटामुक्ती अध्यक्ष कायदेशीर होते की नाही याची चौकशी आम्ही ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे, आणि त्यानंतर याचा खुलासा होईल.’  - ऋतुजा अजिंक्य कांचन, सरपंच

Web Title: pune news controversy over election of Tantamukti president in Uruli Kanchan Gram Sabha; Police had to intervene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.