भामा-आसखेड जलवाहिनीचा ठेकेदार बडतर्फ;अर्धवट कामासाठी महापालिकेची नव्याने निविदा प्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 16:39 IST2026-03-05T16:38:14+5:302026-03-05T16:39:42+5:30
- नव्याने निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे आणखी वर्षभर पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.

भामा-आसखेड जलवाहिनीचा ठेकेदार बडतर्फ;अर्धवट कामासाठी महापालिकेची नव्याने निविदा प्रक्रिया
पिंपरी : भामा आसखेड धरणातून १६७दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आणण्यासाठी महापालिकेने सुरू केलेले जलवाहिनीचे काम ठेकेदाराला तीन वेळा मुदतवाढ देऊनही पूर्ण होऊ शकले नाही. शहरातील वाढती पाणीटंचाई आणि कासवगतीने सुरू असलेल्या कामामुळे अखेर महापालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदाराकडून काम काढून घेतले आहे. आता नव्याने निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे आणखी वर्षभर पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, महापालिकेने आंद्रा धरणातून १०० आणि भामा आसखेड धरणातून १६७, असे एकूण २६७ दशलक्ष लिटर पाणी आणण्याचे नियोजन केले होते. खेड येथील वाकीतर्फे वाडा येथील अशुद्ध जल उपसा केंद्रापासून तळेगाव दाभाडे एमआयडीसीतील नवलाख उंब्रे येथील ब्रेक प्रेशर टँकपर्यंत ७.३० किलोमीटर आणि तेथून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी नेण्यासाठी १८.३० किलोमीटर अंतरावर १४०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे नियोजन होते. हे काम १५ डिसेंबर २०२० रोजी ठेकेदाराला दिले. १६२ कोटी रुपयांचे काम १४ डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु तीन वेळा दिलेल्या मुदतीतही ठेकेदाराला काम पूर्ण करता आले नाही.
सल्लागार एजन्सीवर कोट्यवधींची उधळपट्टी...
आंद्रा व भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून डीआरए कन्सल्टंट या एजन्सीची नियुक्ती ३ मार्च २०१८ रोजी करण्यात आली होती.
तेव्हापासून या सल्लागाराची मूळ मुदत ३६ महिने म्हणजेच २ मार्च २०२१ पर्यंत होती. त्यानंतर प्रथम मुदतवाढ २५ महिन्यांसाठी २ मार्च २०२३ पर्यंत, द्वितीय मुदतवाढ १८ महिन्यांसाठी २ सप्टेंबर २०२४ पर्यंत आणि तृतीय मुदतवाढ १८ महिन्यांसाठी २ मार्च २०२६ पर्यंत दिली आहे.
ती आणखी वाढवून २ ऑक्टोबर २०२६ पर्यंत करण्यात आली आहे. मूळ निविदा ७ कोटी २८ लाख ३७हजार रुपयांची होती, परंतु सल्लागार एजन्सीवर ९ कोटी ३१ लाख ५७ हजार रुपयांचा खर्च करण्यात येत आहे.
दर वाढवून दिला नाही तर काम करणार नाही..!
महापालिकेने मार्च २०२६ पर्यंत ठेकेदाराला मुदतवाढ दिली होती. काम वेळेत पूर्ण होत नसताना ठेकेदाराने मुदत वाढीसह दर वाढवून मागितला होता. दर वाढवून दिले नाही तर काम करू शकत नसल्याचे ठेकेदाराने सुनावले होते. प्रशासनानेही दर वाढवून दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ३० टक्के काम अद्यापही अपूर्ण आहे. ठेकेदाराच्या लेट कारभारामुळे या जलवाहिनीचा खर्च वाढणार आहे.जलवाहिनीचे काम ठेकेदाराला मुदतीत पूर्ण करता आले नाही. त्यामुळे त्याला काढण्यात आले आहे. जलवाहिनीचे ३० टक्के काम शिल्लक आहे. निविदा प्रक्रिया राबवून नवीन ठेकेदार नियुक्त केला जाणार आहे. - श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका