काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर

By राजू इनामदार | Updated: April 20, 2025 12:39 IST2025-04-20T12:24:16+5:302025-04-20T12:39:03+5:30

- काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही हे खरे नाही. मंत्रिमंडळात पहा, त्यातील अनेक मंत्री मूळचे काँग्रेसचे आहे

Pune news Congress has lost its political power what will it do State President HarshVardhan Sapkal gave a timely answer | काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर

काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर

पुणे :काँग्रेस राजकीयदृष्ट्या अजूनही बलवानच आहे, तसे नसते तर २८८ आमदारांपैकी २३९ आमदारांइतके स्पष्ट बहुमत असतानाही ते काँग्रेसच्या लोकांना का घेत आहेत?’ असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. प्रदेशाध्यक्ष म्हणून संघटनेचा चेहरा बदलण्याला आपण प्राधान्य दिले असून, त्याची कार्यवाही सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले.

सपकाळ यांनी शनिवारी (दि. १९) दुपारी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली व संपादकीय विभागाबरोबर संवाद साधला. संपादक संजय आवटे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्यासमवेत प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, शहराध्यक्ष अरविंद शिंदे तसेच काँग्रेसचे अन्य पदाधिकारी होते.

बातमीदारांनी विचारलेल्या विविधांगी प्रश्नांना सपकाळ यांनी मोकळेपणाने उत्तरे दिली. काँग्रेस क्षीण झाली आहे, यावर त्यांनी ठामपणे, ‘तसे नाही’ म्हणून सांगितले, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. पक्ष संघटनेचा चेहरा बदलण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रश्न : काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार?

उत्तर : (ठामपणे) काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही हे खरे नाही. मंत्रिमंडळात पहा, त्यातील अनेक मंत्री मूळचे काँग्रेसचे आहेत. त्याशिवाय ते अजूनही आमचे माजी आमदार पक्षात घेत आहेत. त्यांच्याकडे २३९ आमदार आहेत. तरीही त्यांना ही गरज वाटते आहे. पुणे जिल्ह्यातून दोनजण घेतले. याचा अर्थ काँग्रेसची ताकद आहे असाच होतो.

प्रश्न : पण तुमच्याकडून लोक तिकडे का जात आहेत?

उत्तर : (हसून) सत्ता असल्याशिवाय लोकांची कामे करता येत नाहीत, असा युक्तिवाद करण्यात येतो. विचार, मूल्य, निष्ठा असे काही त्यात दिसत नाही.

प्रश्न : संघटना म्हणून काँग्रेसचे अस्तित्व दिसत नाही?

उत्तर :
त्यात बदल करण्याला मी प्राधान्य दिले आहे. राज्यातील सर्व जिल्हे, तालुके, शहरे यासाठी निरीक्षक नियुक्त केले होते. त्यांनी स्थानिक राजकीय स्थितीचा अभ्यास करून, त्यांच्याकडून प्रमुख पदासाठी किमान तीन नावे द्यायची असे सांगितले होते. आता हे अहवाल येत आहेत. या तीन नावांची प्रदेश स्तरावर मुलाखत घेतली जाईल. वैचारिक बैठक, पक्षनिष्ठा, पक्षाच्या विचारधारेची माहिती, स्थानिक संपर्क अशा काही निकषांची माहिती घेतली जाईल. त्यानंतर ही नियुक्ती होईल. त्यामुळे येत्या काही दिवसात पक्ष संघटनेत झालेले हे बदल दिसतील.

प्रश्न : समाजात वाढता जातीय, धार्मिक विद्वेष याला काँग्रेसकडून आक्रमक प्रत्युत्तर का दिले जात नाही?

उत्तर : आपल्या एकूणच समाजात मागील काही वर्षात बदल झाला आहे. सामाजिक संतुलन बिघडले आहे. प्रत्येक गोष्टीत जातीवाद दिसतो. बीडमध्ये हे प्रामुख्याने दिसून आले. पुंजीवाद वाढला आहे. त्याचा हा परिणाम आहे. हे सामाजिक संतुलन साधणे काँग्रेसला महत्त्वाचे वाटते. काँग्रेसची सत्ता असताना ते केले जात होते. आता काँग्रेस सत्तेवर नाही. जे सत्तेवर आहेत, त्यांच्याकडून यावर काही केले तर जात नाहीच, शिवाय ते वाढेल कसे असे प्रयत्न होतात. आम्ही त्यावर काम करतो आहोत. त्याला वेळ लागेल, मात्र बदल निश्चितपणे दिसेल.

प्रश्न : तरुणांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी काय नियोजन आहे?

उत्तर :
(हसून मान्य करत) पक्षाच्या संघटनेत प्रमुख पदांवर ४० वर्षे वयापर्यंतचे पदाधिकारी असावेत, असा आमचा प्रयत्न आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांचे आम्ही शिबिर, कार्यशाळा घेणार आहोत. त्यात त्यांची विचारांची बैठक पक्की करून घेतली जाईल. संधी मिळत नाही ही त्यांची तक्रार असते. त्यात तथ्यही आहे, संघटनेत त्यांना सामावून घेतले तर ही तक्रार कमी होईल, असा विश्वास आहे. पूर्वी काँग्रेसची अशी शिबिरे, कार्यशाळा होत असत, मागील काही वर्षात ते बंद पडले. आम्ही ते पुन्हा सुरू करत आहोत.

प्रश्न : समाजमाध्यमांच्या (सोशल मीडिया) वापरात काँग्रेस कमी पडते याचे कारण काय?

उत्तर : (हसून) याचे कारण त्यांच्या व आमच्या या विषयांवरच्या बजेटमध्ये आहे. आमच्या या विषयासाठीच्या बजेटपेक्षा त्यांचे बजेट कितीतर मोठे असणार आहे. मात्र आता आम्हीही आमच्याकडे या विषयाचे प्रशिक्षण देऊन तसे कार्यकर्ते तयार करणार आहोत. समाजमाध्यमातून विचार व्यक्त व्हावेत, पक्षाची विचारधारा त्यातून स्पष्ट व्हावी, असा उद्देश असेल.
 
शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार

शेतीमालाला हमीभाव मिळत नाही, त्यामुळे तिथे अस्वस्थता आहे. सोयाबीनचे तेल १७० रुपये किलो होते; पण सोयाबीनचा भाव ४ हजार रुपयेच राहतो. तो ८ हजार रुपये व्हायला हवा तर होत नाही. शेतकऱ्यांचे असे अनेक प्रश्न आहेत, इतर गोष्टीत त्यांना गुंतवले जाते व हे प्रश्न दुर्लक्षित राहतात. आम्ही त्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आंदोलन करणार आहोत. हे प्रश्न चर्चेत यायला हवेत, असा आमचा प्रयत्न असेल. पक्षाकडून त्याला निश्चितपणे महत्त्व दिले जाईल.

सक्ती म्हणजे हिंसाच

कोणत्याही प्रकारची सक्ती ही एक प्रकारची हिंसाच आहे. हिंदी भाषेची इयत्ता पहिलीपासून सक्ती करणे हा तोच प्रकार आहे. तो राजहट्ट आहे. अशा प्रकारची सक्ती करू नये, असे बालमानस शास्त्रज्ञ सांगतात. त्याचा विचारच ही सक्ती करताना केंद्र सरकारने केलेला नाही. राजकीय विचार करूनच ही सक्ती करण्यात आलेली आहे, असे आमचे म्हणणे आहे. यातून मातृभाषेच्या वापराला धोका निर्माण होणार आहे हे स्पष्ट आहे.

Web Title: Pune news Congress has lost its political power what will it do State President HarshVardhan Sapkal gave a timely answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.