क्रीडांगणातून रस्त्याचे काँक्रिटीकरण; माजी आमदाराचे मध्यरात्री ओल्या काँक्रीटमध्ये धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 16:57 IST2026-03-13T16:56:22+5:302026-03-13T16:57:29+5:30

- विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार; ग्रामस्थांचा ‘जुन्या वहिवाटीचा रस्ता’ असल्याचा दावा 

pune news concreting of road from playground; Former MLA holds protest in wet concrete at midnight | क्रीडांगणातून रस्त्याचे काँक्रिटीकरण; माजी आमदाराचे मध्यरात्री ओल्या काँक्रीटमध्ये धरणे आंदोलन

क्रीडांगणातून रस्त्याचे काँक्रिटीकरण; माजी आमदाराचे मध्यरात्री ओल्या काँक्रीटमध्ये धरणे आंदोलन

कोरेगाव भीमा : फुलगाव (ता. हवेली) येथे शैक्षणिक संस्थेच्या क्रीडांगणाच्या जागेतून विनापरवानगी रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू केल्याच्या निषेधार्थ माजी आमदार दीपक पायगुडे यांनी मध्यरात्री ओल्या काँक्रीटमध्ये बसून धरणे आंदोलन सुरू केले. सकाळी स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थांशी चर्चेनंतरही यावर तोडगा न निघाल्याने विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा निर्धार लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक व माजी आमदार दीपक पायगुडे यांनी व्यक्त केला. दरम्यान, ग्रामस्थांनी हा रस्ता जुनाच वहिवाटीचा असल्याचा दावा करत यापूर्वी झालेल्या कामांना आक्षेप का घेतला नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.

संस्थेकडून दिलेल्या माहितीनुसार, फुलगाव येथे लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे शैक्षणिक संकुल तसेच क्रीडांगण आहे. संस्थेच्या सर्व्हे नं. २००/१-ब मधील मालकी हद्दीतून श्री सत्य साई सेवा ट्रस्ट तसेच शेजारील वस्ती आणि शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी संस्थेने नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली होती. लगतच्या जागेतून पक्का रस्ता करण्याची तयारीही संस्थेने दर्शविली होती. मात्र, संस्थेला पूर्वलेखी सूचना अथवा संयुक्त मोजणी न करता गेल्या आठवड्यात २० फूट रुंदीच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले.

हा रस्ता शाळेच्या क्रिकेट मैदानातून जात असल्याने क्रीडांगणाचे नुकसान होत असल्याचा दावा करत संस्थेने या कामास आक्षेप घेतला. तसेच महसूल विभाग, ग्रामपंचायत आणि संस्थेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत संयुक्त मोजणी करून रस्ता मैदानातून न नेता शाळेच्या सीमेलगत करण्याची मागणी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, प्रशासनाने दखल न घेतल्याचा आरोप करत काम सुरूच ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

याची माहिती मिळताच माजी आमदार दीपक पायगुडे मध्यरात्री साडेबारा वाजता घटनास्थळी पोहोचले आणि सुरू असलेल्या कामाच्या ओल्या सिमेंट काँक्रीटमध्ये बसून त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. यावेळी लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी येत परिस्थितीचा आढावा घेतला.

सकाळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य पै. किरण साकोरे, माजी सरपंच भानुदास साकोरे, राहुल वागस्कर, भानुदास वागस्कर, शंकर वागस्कर, पोपट खुळे आदींसह ग्रामस्थांनी पायगुडे यांच्याशी चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांनी हा रस्ता शेजारील वस्ती, शेतकरी आणि श्री सत्य साई सेवा ट्रस्टसह अनेकांच्या वापरातील जुना वहिवाटीचा असल्याचे सांगितले. या रस्त्यावर यापूर्वी तीन ते चार वेळा शासकीय निधीतून मजबुतीकरण आणि डांबरीकरणाचे काम झाले असून सध्या आमदार निधीतून काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वीच्या कामांना संस्थेने आक्षेप घेतला नाही, मग आता काँक्रिटीकरणाच्या कामालाच विरोध का, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. रस्ता एका बाजूने घेण्याबाबतही गावकऱ्यांनी सहकार्याची भूमिका दर्शविली. मात्र, चर्चेतून तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच राहिले.

सायंकाळी जिल्हा परिषदेकडून उपअभियंता, शाखा अभियंता आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तरीही मार्ग न निघाल्याने सायंकाळपर्यंत आंदोलन सुरूच होते. सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि क्रीडांगण वाचविण्यासाठी आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे पायगुडे यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला; मात्र संपर्क होऊ शकला नाही.

Web Title : खेल के मैदान पर सड़क निर्माण का विरोध; पूर्व विधायक कंक्रीट में बैठे।

Web Summary : पूर्व विधायक दीपक पायगुडे ने फुलगाँव में खेल के मैदान से अनाधिकृत सड़क निर्माण का विरोध गीली कंक्रीट में बैठकर किया। स्थानीय लोगों का दावा है कि यह एक पुरानी सड़क है, लेकिन पायगुडे छात्रों के अधिकारों के लिए विरोध जारी रखते हैं, संयुक्त सर्वेक्षण की मांग करते हैं।

Web Title : Ex-MLA Protests Road Construction on Playground; Sits in Wet Concrete.

Web Summary : Former MLA Deepak Paygude protested unauthorized road construction through a playground in Phulgaon by staging a sit-in protest in wet concrete. Locals claim it's an old road, but Paygude continues his protest for students' rights, demanding a joint survey.