इंदापुरात १७ हजार बोगस मतदारांचा दावा तथ्यहीन; तहसीलदार बनसोडे यांनी केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 11:30 IST2025-08-26T11:30:09+5:302025-08-26T11:30:21+5:30
विधानसभा मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रभागांमध्ये विभागून निवडणुकीसाठी छापणे आणि अधिप्रमाणित करणे आवश्यक

इंदापुरात १७ हजार बोगस मतदारांचा दावा तथ्यहीन; तहसीलदार बनसोडे यांनी केले स्पष्ट
इंदापूर : इंदापूर तालुक्यात सुमारे १७ हजार बोगस मतदार असल्याचा दावा नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व निरनिमगाव गावचे सरपंच प्रताप सर्जेराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला होता. मात्र, या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी स्पष्ट केले आहे.
प्रताप पाटील यांच्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने दैनिक लोकमतच्या रविवारच्या (दि. २४ ऑगस्ट) अंकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तासंदर्भात तहसीलदार बनसोडे यांनी खुलासा केला. ते म्हणाले, निरनिमगाव गावचे विजय मारुती पाटील यांनी यापूर्वी दाखल केलेल्या तक्रारीनुसार चौकशी पूर्ण झाली असून, संबंधितांना म्हणणे मांडण्याची संधी देऊन सुनावणी घेण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान अनेक मतदारांनी सांगितले की, ते निरनिमगाव येथील रहिवासी असून, नोकरी किंवा मोलमजुरीच्या कामानिमित्त बाहेरगावी जातात. मात्र, त्यांचे मूळ गाव निरनिमगाव असल्याने त्यांची नावे मतदार यादीतून वगळू नयेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या ३० जानेवारी २०२३ च्या पत्रानुसार आणि २२ डिसेंबर २०२३ च्या शुद्धीपत्रकात नमूद केलेल्या आदेशांनुसार, विधानसभा मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रभागांमध्ये विभागून निवडणुकीसाठी छापणे आणि अधिप्रमाणित करणे आवश्यक आहे. यामध्ये नावे वाढवणे, कमी करणे किंवा सुधारणा करण्याची परवानगी नाही. मतदार यादीवर हरकत घेण्यासाठी विहित नमुन्यातील परिशिष्ट-अ आणि परिशिष्ट-ब मध्ये तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. तक्रारदाराने आक्षेपित मतदारांच्या वास्तव्याचा पुरावा जोडणे बंधनकारक आहे आणि प्रत्येक मतदारासाठी स्वतंत्र हरकत अर्ज दाखल करावा लागतो. एकगठ्ठा हरकती दाखल करण्यास परवानगी नाही.
बनसोडे यांनी पुढे सांगितले, हरकतदाराने प्रत्येक मतदारासाठी स्वतंत्र अर्ज दाखल केलेला नाही. तसेच, आक्षेपित मतदार अन्य गावच्या मतदार यादीत असल्याचा पुरावाही सादर केलेला नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एकगठ्ठा हरकती दाखल करता येत नाहीत. यानुसार, तक्रारीवरून कोणतेही नाव मतदार यादीतून कमी करता येणार नाही. त्यामुळे तक्रार अर्ज निकाली काढण्यात आला आहे.
निरनिमगावची मतदार संख्या २,९७४
विधानसभा २०२४ च्या मतदार यादीप्रमाणे, निरनिमगाव गावाची एकूण मतदार संख्या २,९७४ आहे. बी.एल.ओ. सर्व्हेमध्ये एकही दुबार मतदार आढळले नाही. नमुना क्रमांक ७ नुसार भरण्यात आलेल्या मतदारांची संख्या फक्त २ आहे, असे तहसीलदार बनसोडे यांनी स्पष्ट केले.