मुख्यमंत्र्यांची माहिती ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी पुरेशी; राजू शेट्टी यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 18:01 IST2025-09-27T18:00:02+5:302025-09-27T18:01:53+5:30
केंद्र सरकारने बिहारला मदत केली, पंजाबला मदतीची भूमिका घेतली; मात्र महाराष्ट्राबाबत निर्णय घेण्यात टाळाटाळ होत आहे. महाराष्ट्र उद्ध्वस्त होण्याची वाट बघत आहात काय?

मुख्यमंत्र्यांची माहिती ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी पुरेशी; राजू शेट्टी यांचे मत
पुणे : “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे मान्य केले आहे. हा ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी मोठा पुरावा आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा,” अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.
पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. शेट्टी म्हणाले, “केंद्र सरकारने बिहारला मदत केली, पंजाबला मदतीची भूमिका घेतली; मात्र महाराष्ट्राबाबत निर्णय घेण्यात टाळाटाळ होत आहे. महाराष्ट्र उद्ध्वस्त होण्याची वाट बघत आहात काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा माझी एवढीच विनंती आहे की, महाराष्ट्राला गृहित धरू नका, महागात पडेल. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत पिके वाहून गेली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची गरज आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याऐवजी सरकार बाकीच्याच गोष्टी करत आहे.”
ज्या शेतकऱ्यांनी पिकांसाठी कर्ज काढले आहे त्यांचे कर्ज तत्काळ माफ करावे. तसेच, ज्यांनी कर्ज न घेता खासगी सावकार किंवा इतर मार्गाने पैसा उचलला आहे, त्यांना बँक किती कर्ज देऊ शकते तेवढी रक्कम नुकसानभरपाई स्वरूपात द्यावी. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्कही माफ करावे, अशी मागणीही शेट्टी यांनी केली.