बारामतीत बँक प्रेशरमुळे चीफ मॅनेजरचं टोकाचं पाऊल; चिठ्ठीतून धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 12:11 IST2025-07-18T12:09:18+5:302025-07-18T12:11:26+5:30
बारामतीच्या बँक ऑफ बडोदामधील धक्कादायक घटना

बारामतीत बँक प्रेशरमुळे चीफ मॅनेजरचं टोकाचं पाऊल; चिठ्ठीतून धक्कादायक खुलासा
बारामती -बारामती शहरातील भिगवण रस्ता येथील बँक ऑफ बडोदाच्या बारामती शाखेच्या चीफ मॅनेजरने बँकेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. १७) मध्यरात्री घडला आहे. शिवशंकर मित्रा (वय ५२, मूळ रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश, सध्या रा. बारामती) असे त्यांचे नाव आहे. या घटनेमुळे बारामतीत मोठी खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मित्रा यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली असून त्यामध्ये अतिरिक्त दबावामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे मित्रा यांनी पाच दिवसांपूर्वीच बँकेच्या वरिष्ठ कार्यालयाकडे स्वेच्छानिवृत्ती मागितली होती, परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वाढत्या तणावातून त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.
चिठ्ठीत त्यांनी लिहिले आहे की,'मी शिवशंकर मित्रा, मुख्य प्रबंधक, बँक ऑफ बडोदा, बारामती. मी आज बँकेच्या अतिरिक्त दबावामुळे आत्महत्या करत आहे. माझी बँकेकडे विनंती आहे की, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त दबाव टाकू नका. सर्वांना आपापल्या जबाबदारीची पूर्णपणे जाणीव आहे आणि ते शंभर टक्के आपले योगदान देत असतात. मी माझी आत्महत्या पूर्णपणे शुद्धीत असताना व स्वेच्छेने करत आहे. त्यामध्ये माझ्या कुटुंबाची कोणतीही चूक नाही. कोणालाही जबाबदार धरू नये. फक्त बँकेच्या प्रचंड दबावामुळे मी जीवन संपवत आहे." पत्नी व मुलगी यांना उद्देशून त्यांनी लिहिले आहे की "प्रिया, मला माफ कर. माही, मला माफ कर. शक्य झाल्यास माझे नेत्रदान करावे, अशी इच्छा देखील चिठ्ठीत व्यक्त केली आहे.
दरम्यान, या चिठ्ठीतील मजकूर नेमका त्यांनीच लिहिला आहे का, वरिष्ठांकडून त्यांना काही त्रास होता का, यासंबंधी आता पोलिसांचा तपास सुरू आहे. मित्रा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी सांगितले.