माझ्यावरच्या हल्ल्याचा मास्टर माईंड चंद्रशेखर बावनकुळेच;प्रविण गायकवाड यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 15:50 IST2025-07-16T15:46:54+5:302025-07-16T15:50:48+5:30
- आपली हत्या करण्याचाच त्यांचा डाव होता, त्यासाठीच विषारी वंगण डोक्यावर ओतण्यात आले, त्याशिवाय तिथे काही हत्यारेही होती असा दावा त्यांनी केला.

माझ्यावरच्या हल्ल्याचा मास्टर माईंड चंद्रशेखर बावनकुळेच;प्रविण गायकवाड यांचा गंभीर आरोप
पुणे: अक्कलकोट येथे माझ्यावर झालेल्या हल्ल्याचा मास्टर माईंड महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत असा गंभीर आरोप संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी केला. ‘आपली हत्या करण्याचाच त्यांचा डाव होता, त्यासाठीच विषारी वंगण डोक्यावर ओतण्यात आले, त्याशिवाय तिथे काही हत्यारेही होती’ असा दावा त्यांनी केला.
गायकवाड सोलापूरमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले असताना तिथे त्यांच्यावर शाई फेकण्यात आली व धक्काबुक्की करण्यात आली. त्यासंदर्भात पुण्यात बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गायकवाड यांनी मंत्री बावनकुळे हेच या हल्ल्यामागे असल्याचा गंभीर आरोप केला. सोलापूरचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी कदम, शहराध्यक्ष शाम कदम तसेच रेखा कोंडे हे पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाला संभाजी ब्रिगेड बहुजन समाजासाठी करत असलेले काम पसंत नाही. त्यामुळेच आम्हाला संपवण्याचा डाव त्यांनी आखला होता. या घटनेतील आरोपी दीपक काटे व बावनकुळे यांच्यातील संबधाचे व्हीडिओ ऑडिओ पुरावे समोर आलेत. समाजमाध्यमांवरून ते व्हायरल झालेत. काटे याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यामुळेच त्याच्यावर आवश्यक ती खुनाचा प्रयत्न वगैरे कलमे लावलीच गेलेली नाहीत असे गायकवाड म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्रीही आहेत. बावनकुळे व आरोपी दीपक काटे यांचे संबध दाखवणारे पुरावे समोर आले. तो भाजपचा कार्यकर्ता आहे हे त्यातून स्पष्ट दिसते आहे. आता त्याच्यावर कारवाई होईल हे पाहण्याची जबाबदारी फडणवीस यांचीच आहे. फुले, शाहु, आंबेडकर यांच्या विचारसरणीला प्रमाण मानून त्याप्रमाणे बहुजन समाजातील युवकांची शैक्षणिक, आर्थिक प्रगती व्हावी यासाठी आम्ही संभाजी ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भारतीय जनता पक्षाच्याही कार्यकर्त्यांबद्दल मला आदर आहे, मात्र विचारांची लढाई विचारांनी लढायला हवी. ते दुसऱ्यांच्या माध्यमातून लोकशाही संपवण्याचे काम अशा हल्ल्यांमधून करत आहेत अशी टीका गायकवाड यांनी केली.
संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे या आक्षेपात काहीही अर्थ नव्हता. समाजातील कोणाही विवेकी व्यक्तीच्या ते लक्षात येईल. तरीही त्यांचे म्हणणे समजून घेऊन आम्ही त्यांना या बदलातील तांत्रिक अडचण सांगितली होती. पण तरीही हल्ला करण्यात आला. संपवूनच टाकण्याच्या उद्देशानाच करण्यात आला. सोलापूरमधील ज्या कार्यक्रमाला मी गेलो होते, त्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी या हल्ल्याची दखल घेतली नाही हेही दु:खद असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. त्यांनी किमान या घटनेची फिर्याद करायला हवी होती, तीसुद्धा आमच्याच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली अशी माहिती गायकवाड यांनी दिली.
काहीजण वैयक्तिक प्रेम करतात. त्यांच्यापैकी काहींनी महिनाभरापूर्वी माहिती दिली होती. एका बैठकीत संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, मराठा सेवा संघ व फुले, शाहु, आंबेडकर यांच्या विचारांनी काम करणाऱ्या संघटनांचा बंदोबस्त करण्याबाबत चर्चा झाली अशी माहिती देऊन त्यांनी सावध राहण्याचा सल्ला दिला होता असे गायकवाड म्हणाले.