चाकणची वाहतूक कोंडी: चक्रव्यूहात अडकले नागरिक, उपाययोजनांचा अभाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 20:13 IST2025-09-03T20:13:45+5:302025-09-03T20:13:55+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाहणी दौऱ्यानंतरही या समस्येवर ठोस उपाययोजना झाल्या नसून, उलट वाहतूक कोंडीत अधिकच भर पडल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिक, वाहनचालक आणि प्रवासी हैराण झाले आहेत.

चाकणची वाहतूक कोंडी: चक्रव्यूहात अडकले नागरिक, उपाययोजनांचा अभाव
चाकण : चाकणमधील वाहतूक कोंडी आता स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. पुणे-नाशिक आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गावरील प्रमुख चौकांमध्ये निर्माण होणारी ही कोंडी एकप्रकारे चक्रव्यूहच बनली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाहणी दौऱ्यानंतरही या समस्येवर ठोस उपाययोजना झाल्या नसून, उलट वाहतूक कोंडीत अधिकच भर पडल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिक, वाहनचालक आणि प्रवासी हैराण झाले आहेत.
पुणे-नाशिक महामार्गावरील मोई-चिंबळी फाटा, कुरुळी फाटा, स्पाइसर चौक, आळंदी फाटा, बंगला वस्ती चौक, बालाजी नगर, चाकण चौक, आंबेठाण चौक आणि भाम फाटा येथे वाहतूक कोंडीने कहर केला आहे. या ठिकाणी चार ते पाच किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागत असून, वाहनचालकांना तासन्तास वाट पाहावी लागत आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गावरही देहू फाटा, खालुंब्रे, ह्युंदाई चौक, एचपी चौक, महाळुंगे, खराबवाडी, वाघजाईनगर फाटा, राणूबाईमळा, तळेगाव चौक, माणिक चौक, मेदनकरवाडी आणि कडाचीवाडी येथेही वाहतूक कोंडीचा बोजवारा उडाला आहे. चाकण-आंबेठाण-वासुली फाटा मार्गावरही हेच चित्र आहे.
पावसामुळे खड्ड्यांचे साम्राज्य, अपघातांना निमंत्रण
चाकण परिसरात पावसाने हजेरी लावल्याने महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही, परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा वाहने खड्ड्यांमध्ये अडकून बंद पडतात, ज्यामुळे कोंडी आणखी गंभीर होते. पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने रस्त्यांवर लांबच लांब रांगा लागत आहेत.
रुग्णवाहिका, स्कूलबसही अडकल्या
वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका रुग्णवाहिका आणि स्कूलबस यांना बसत आहे. रुग्णवाहिका अडकल्याने रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचणे कठीण झाले आहे, तर स्कूलबसच्या कोंडीमुळे लहान मुलांना ताटकळत बसावे लागत आहे. बेशिस्त रिक्षाचालक आणि कंपनी बसचालकांमुळेही कोंडीत भर पडत आहे. औद्योगिक परिसरात बस, ट्रक, टेम्पो आणि जड वाहनांची संख्या हजारोंच्या घरात असल्याने हा प्रश्न अधिकच बिकट झाला आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही निराशा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑगस्ट महिन्यात चाकणचा दौरा करून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानंतर चाकण आणि आंबेठाण चौकातील विजेचे खांब हटवणे, खड्डे बुजवणे आणि अतिक्रमणे हटवण्यासारखी काही कामे झाली. मात्र, या उपाययोजनांचा वाहतूक कोंडीवर फारसा परिणाम झालेला नाही. उलट, कोंडी कमी होण्याऐवजी वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ‘फक्त आश्वासनांचे गाजर दाखवले जाते; पण ठोस उपाययोजना होतच नाहीत,’ अशी खंत स्थानिक व्यक्त करत आहेत.
नागरिकांचे प्रश्न -
वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय कधी होणार?
खड्डेमुक्त रस्ते आणि पाण्याच्या निचऱ्यासाठी प्रभावी व्यवस्था का होत नाही?
रुग्णवाहिका आणि स्कूलबस यांना प्राधान्य का मिळत नाही?
स्थानिकांची मागणी -
नागरिकांनी रस्त्यांचे रुंदीकरण, वाहतूक नियोजनासाठी तज्ज्ञ समिती, प्रभावी पाणी निचरा व्यवस्था आणि बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. जोपर्यंत ठोस उपाययोजना होत नाहीत, तोपर्यंत चाकणच्या या चक्रव्यूहातून सुटका होणे कठीण आहे.