फांद्या तोडतानाचा निष्काळजीपणा तरुणाच्या जिवावर; गळ्यासह अन्ननलिकेला गंभीर दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 19:11 IST2026-02-13T19:11:06+5:302026-02-13T19:11:18+5:30
- महापौरांकडून रुग्णालयात जाऊन विचारपूस

फांद्या तोडतानाचा निष्काळजीपणा तरुणाच्या जिवावर; गळ्यासह अन्ननलिकेला गंभीर दुखापत
पुणे : कर्वेनगर येथील मेघराज सोसायटीच्या समोरील झाडाच्या फांद्या तोडताना नियमांचे पालन न केल्याने दुचाकीस्वाराला मोठी दुखापत होऊन त्याचा गळा चिरल्याची घटना घडली असून, सोसायटी आणि ठेकेदाराने केलेल्या निष्काळजीपणा तरुणाच्या जिवावर उठल्याचे समोर आले आहे. दरम्यान, महापौर मंजुषा नागपुरे यांनी जखमी तरुणाची रुग्णालयात जाऊन पाहणी करीत त्याच्या नातेवाइकांची विचारपूस केली.
कर्वेनगरमधील मेघराज गृहनिर्माण सोसायटीने त्यांच्या आवारात वाढलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाकडून परवानगी घेतली होती. त्यानुसार त्यांच्याकडून बुधवारी (ता. ११) दुपारी फांद्या तोडण्याचे काम सुरू होते. पण, यावेळी महापालिकेला पूर्वकल्पना देऊन तेथे साहाय्यक उद्यान अधीक्षक किंवा हॉर्टिकल्चर मिस्त्री यांच्या उपस्थितीत पोलिसांकडून रस्ता बंद करण्याची परवानगी घेऊन काम करणे आवश्यक होते. पण, या दोन्ही नियमांचे पालन सोसायटीने व ठेकेदाराने केले नाही.
रामेश्वर अवतीकर हा तरुण बुधवारी (ता. ११) दुपारी दोनच्या सुमारास मित्र सुधीर लांडगे याच्यासोबत कर्वेनगरमधील अलंकार पोलिस ठाण्याजवळून दुचाकीवरून जात होता. हे दोघे मेघराज सोसायटीच्या समोरील रस्त्यावरून जात होते. त्यावेळी त्यांना आडवी आलेली दोरी दिसली नाही. रामेश्वर यांच्या थेट गळ्याला ही दोरी अडकली, दुचाकी वेगात असल्याने दोरी गळ्याला घासून गळा कापला गेला. दुचाकीवरून दोघेही खाली पडून जखमी झाले. रामेश्वरच्या गळ्यातून मोठा रक्तस्राव सुरू झाला. या दोघांनाही नागरिकांनी त्वरित खासगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात नेल्यानंतर या तरुणाच्या गळ्यासह त्याच्या अन्ननलिकेलाही गंभीर जखम झाली असल्याचे निदर्शनास आले. महापालिकेच्या साहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे यांनी रुग्णालयात जाऊन या प्रकरणाची चौकशी करून माहिती घेतली.
महापौरांनी घेतली भेट
जखमी रामेश्वर अवतीकर या तरुणाची महापौर मंजुषा नागपुरे यांनी गुरुवारी रुग्णालयात भेट घेतली. या वेळी त्यांनी रुग्णाच्या प्रकृतीची माहिती घेतली तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा केली.