आरटीओ चलनाची एपीके फाइल पाठवून व्यावसायिकाला अडीच लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 19:16 IST2025-10-31T19:15:51+5:302025-10-31T19:16:46+5:30
घरी असताना त्यांना मोबाइलवरील व्हॉट्सअपवर एक आरटीओ चलन आले. ती एपीके फाइल होती. त्यांनी ती फाइल ओपन करून पाहिली असता त्यांच्या गाडीवर ५०० रुपये दंड असल्याचे नमूद होते.

आरटीओ चलनाची एपीके फाइल पाठवून व्यावसायिकाला अडीच लाखांचा गंडा
पुणे : व्यावसायिकाला व्हॉट्सॲपवर आरटीओच्या चलनाची एपीके फाइल आली. त्यांनी फाइल ओपन करून पाहिले असता त्यात त्यांच्या गाडीवर ५०० रुपये दंड होता. त्याचवेळी त्यांना पुन्हा एका ठिकाणी क्लिक करा असा मेसेज आला. त्यांनी त्या ठिकाणी क्लिक केल्यावर त्यांच्या बँक खात्यातून ५ व्यवहार होऊन २ लाख ५५ हजार ४३४ रुपये डेबिट झाले.
याबाबत कात्रजमधील खोपडेनगर येथे राहणाऱ्या एका ४० वर्षीय व्यावसायिकाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना दिवशी ६ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी असताना त्यांना मोबाइलवरील व्हॉट्सअपवर एक आरटीओ चलन आले. ती एपीके फाइल होती. त्यांनी ती फाइल ओपन करून पाहिली असता त्यांच्या गाडीवर ५०० रुपये दंड असल्याचे नमूद होते. त्यांना काय करायचे हे समजले नाही. त्यावेळी त्यांना पुन्हा एका ठिकाणी क्लिक करा, असा मेसेज आला. त्यांनी त्या ठिकाणी क्लिक केले. त्यानंतर ते घरात मोबाइल ठेवून गणपती विसर्जनासाठी कात्रज तलाव येथे गेले होते. तेथून ते दुपारी ४ वाजता परत आले.
त्यांच्या पंजाब नॅशनल बँक खात्यातून १ लाख ८६ हजार १८१ रुपये डेबिट झाले होते. त्यांनी बँक खात्यातील शिल्लक दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला. परंतु रक्कम ट्रान्सफर झाली नाही. त्यांनी बँक खात्याची माहिती घेतल्यावर त्यांच्या खात्यातून ५ व्यवहाराद्वारे २ लाख ५५ हजार ४३४ रुपये काढण्यात आल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने भारती विद्यापीठ पोलिस ठाणे व ऑनलाइन पोर्टलवर तक्रार केली. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे तपास करत आहेत.