बस तिकीट दरवाढीमुळे 'पीएमपी'च्या उत्पन्नामध्ये तब्बल ५० टक्के वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 14:54 IST2025-06-06T14:53:20+5:302025-06-06T14:54:59+5:30
- दैनिक पासची किंमत ४० वरून ७० रुपये, तर मासिक पास ९०० वरून १,५०० रुपये, दरवाढीमुळे लांबपल्ल्याच्या प्रवास खर्चात लक्षणीय वाढ; अधिक पैसे मोजावे लागत असल्याने प्रवासी हैराण

बस तिकीट दरवाढीमुळे 'पीएमपी'च्या उत्पन्नामध्ये तब्बल ५० टक्के वाढ
पिंपरी :पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (पीएमपीएमएल) दहा वर्षानंतर १ जून २०२५ पासून बस भाड्यात वाढ केली. यामुळे 'पीएमपी'च्या उत्पन्नात ५० टक्क्यांनी वाढ झाली असून, नव्या दरानुसार, किमान भाडे ५ रुपयांवरून १० रुपये झाले आहे, दैनिक पास ४० वरून ७० रुपये, तर मासिक पास ९०० वरून १,५०० रुपये झाला आहे. या वाढीमुळे लांबपल्ल्याच्या प्रवासाचा खर्च लक्षणीय वाढला आहे. यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आर्थिक ताण आला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील निगडी, भोसरी व पिंपरी येथील पीएमपी आगारातून ९६ मार्गावर ३९१ बस धावत असून, त्यांच्या दररोज ४,३९२ फेऱ्या होतात. या आगारांतून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही बस जातात. या तिन्ही आगारांच्या दैनंदिन उत्पन्नात ४० ते ५० टक्के वाढ झाली आहे.
'पीएमपी'ने वाढत्या इंधन खर्च, देखभाल खर्च आणि नवीन सीएनजी बसेस तसेच डिजिटल तिकीट प्रणालीसाठी ही वाढ आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. तरीही, प्रवाशांचा असंतोष आणि खासगी वाहनांच्या वापरात वाढ होण्याची शक्यता यामुळे प्रशासनासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.तिकीट दरवाढ केल्याने सामान्य नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यापेक्षा खासगी वाहनाने प्रवास करणे स्वस्त वाटत असल्याचे मत अनेक प्रवाशांनी व्यक्त केले.
प्रवासाच्या खर्चामध्ये अचानक दुप्पटीने वाढ
केवळ तिकीटाचे दर वाढवले नसून पीएमपीने पासच्या दरातही वाढ केली आहे. प्रवासाचा खर्च एकदम दुप्पटीने वाढल्याने नागरिकांचे महिन्याचे बजेट कोलमडणार असून आर्थिक ताण येणार आहे.
भाडेवाढीमुळे तीव्र नाराजी
भाडेवाढीच्या निर्णयामुळे सामान्य प्रवासी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. एका प्रवाशाने सांगितले, भाडे वाढले; पण बसेसची अवस्था आणि वेळापत्रक सुधारले नाही. ही वाढ सामान्यांना झटका देणारी ठरवली आहे. मासिक खर्च आता दुप्पट होणार, असे एका प्रवाशाने सांगितले. स्वच्छता, वेळेवर सेवा आणि बसेसची दुरुस्ती यावर भर देण्याची मागणी अनेक प्रवाशांनी केली आहे.
पीएमपीएमएलकडून दहा वर्षांनंतर १ जून २०२५ पासून बस भाड्यामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे 'पीएमपी'च्या एकूण उत्पन्नात ४० ते ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
किशोर चौहान, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी