बस कंडक्टरने डिव्हायडरवरून उडी मारून चोरट्याला पकडले; महापालिका भवन पीएमपी बसस्थानकात थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 19:31 IST2025-09-16T19:22:04+5:302025-09-16T19:31:31+5:30
या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एकास अटक करून त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.

बस कंडक्टरने डिव्हायडरवरून उडी मारून चोरट्याला पकडले; महापालिका भवन पीएमपी बसस्थानकात थरार
पुणे : बसमधून उतरताना मदत करण्याचा बहाणा करून महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या कट करून पळून जाणाऱ्या चोरट्याला पीएमपी बस कंडक्टरने डिव्हायडरवरून उडी मारून पकडले. ही घटना सोमवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास महापालिका येथील पीएमपी बसस्थानकाच्या परिसरात घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एकास अटक करून त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.
लखन सुहास जाधव (वय ३०, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) असे पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. चाँद शेख (रा. मुंढवा) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत रेणू हाडू साहू (वय ५६, रा. आनंदनगर, सणसवाडी, ता. शिरुर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सणसवाडी येथून बसने महापालिका बसस्थानकात आल्या होत्या. त्या बसमधून उतरत असताना त्यांच्या हातामध्ये पिशवी होती. तेथील दोघांनी त्यांना मदत करतो, असे म्हणून एकाने त्यांची पिशवी असलेला हात धरला.
त्यावेळी बसमधील कंडक्टर म्हणाले, तुम्ही का थांबलात, उतरत का नाही?. त्यावर फिर्यादी म्हणाल्या, या माणसाने माझी पिशवी पकडून ठेवली आहे. त्यानंतर ती व्यक्ती पिशवी सोडून पळू लागला. त्यावेळी फिर्यादींनी आपल्या उजव्या हाताकडे बघितल्यानंतर हातातील सोन्याची बांगडी गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. ते ऐकून बस कंडक्टरने एका बाजूने रस्त्यामधील डिव्हायडरवर उडी मारली आणि पळून जाणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्यानंतर पोलिसांना फोन करून बोलावून घेत चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. अधिक तपास पोलिस हवालदार दीपक रोमाडे तपास करीत आहेत.
दागिने पळविणारे चोरटे मुंढवा परिसरातील जास्त
गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने, हातातील सोन्याच्या बांगड्या कट करून चोरून नेण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. अशा प्रकारच्या चोऱ्या करण्यामध्ये मुंढवा परिसरातील चोरटे सक्रिय असल्याचे आतापर्यंतच्या घटनांमध्ये दिसून आले आहे.