आरोप निष्प्रभ झाल्याने भाजप नेते वैफल्यग्रस्त; काँग्रेसची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 19:39 IST2025-07-22T19:38:34+5:302025-07-22T19:39:17+5:30
- राहुल गांधी यांच्यावर हास्यास्पद आरोप

आरोप निष्प्रभ झाल्याने भाजप नेते वैफल्यग्रस्त; काँग्रेसची टीका
पुणे : भारतीय जनता पक्षाकडून गांधी परिवारावर वारंवार आरोप करण्यात येत आहेत, मात्र ते सिद्ध करण्यात यश येत नसल्याने भाजप नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत व राहुल गांधी यांच्यावर हास्यास्पद आरोप करत सुटले आहेत, अशी टीका काँग्रेसने केली.
लोकसभेतील विरोधा पक्षनेतेपदी असलेले राहुल त्यांच्या पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केला आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी त्याला प्रत्युत्तर देताना वैफल्यग्रस्त झाल्यामुळेच भाजपनेते असे आरोप करत असल्याची टीका केली. त्रिवेदी यांनी त्यांचे आरोप सिद्ध करणारा एकतरी पुरावा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
तिवारी म्हणाले, गेली अनेक वर्षे भाजप व त्यांचे सहकारी गांधी परिवारावर भ्रष्टाचाराचे वेगवेगळे आरोप करत आहेत, मात्र प्रत्येक वेळी त्यांना ते आरोप सिद्ध करण्यात अपयश आले. त्यातून भाजप नेते निराश झाले. त्यानंतर आता राहुल गांधी त्यांचे मेव्हणे रॉबर्ट वाध्रा यांच्यासाठी विरोधी पक्षनेतेपदाचा गैरवापर करत आहेत, असा आरोप करण्यात आला.
एप्रिल २०२३ मध्ये भाजपच्या हरियाना सरकारला “रॉबर्ट वाध्रा यांनी कोणत्याही नियमांचा व कायद्याचा भंग केला नाही” याचे प्रतिज्ञापत्रक दाखल करावे लागले. त्यामुळे राहुल गांधी वाध्रा यांच्यासाठी विरोधी पक्षनेतेपदाचा गैरवापर करत आहेत, या आरोपातील हवाच निघून गेली. वास्तविक भाजपच्या नेत्यांकडून त्यांना मिळालेली मंत्रिपदे तसेच केंद्रात, राज्यांमध्ये मिळालेल्या सत्तेचा गैरवापर करत सरकारी यंत्रणांना विरोधकांवर दबाव टाकण्याची सक्ती केली आहे. त्याकडे भाजप नेत्यांनी लक्ष द्यावे, असे तिवारी म्हणाले.