पुणे : गणेशोत्सवाच्या कालावधीत शहरातील मध्यवर्ती पेठांमधील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद असतात. त्यामुळे शहराच्या पश्चिम भागातील उपनगरांना जोडणारा भिडे पूल दुचाकी वाहनांसाठी महत्त्वाचा ठरत आहे. वाहतूक काेंडी टाळण्यासाठी पुणे महापालिका प्रशासनाच्या सूचनेनुसार महामेट्रो येत्या २० ऑगस्टपासून भिडे पूल पुढील २० दिवसांसाठी खुला करणार आहे.
महामेट्रोकडून सदाशिव पेठ ते डेक्कन मेट्रो स्थानक मार्गावर असणाऱ्या भिडे पुलावर एक पादचारी पूल उभारण्यात येत आहे. हे काम मार्चमध्ये सुरू झाले होते आणि प्राथमिकतः ६ जूनपर्यंत पूल वाहतुकीसाठी खुले करायचे होते. पण, २० टक्केच काम पूर्ण झाल्यामुळे, महामेट्रोने १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत पूल बंद ठेवण्याची मागणी केली होती. मात्र, या कालावधीतही हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे मेट्रोकडून आणखी मुदतवाढ मागण्यात आली आहे.
येत्या २७ ऑगस्टपासून शहरात गणेशोत्सव सुरू होत आहे. गणेशोत्सवातील वाहतूककोंडी लक्षात घेऊन त्यापूर्वीच हा पूल सुरू करण्याची मागणी गणेश मंडळांकडून करण्यात आली होती. त्यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून उत्सवाच्या एक आठवडा आधी पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार, महामेट्रोकडून पूल तीन आठवड्यांसाठी खुला केला जाणार आहे.