सावधान..! ‘तुमच्या गाडीचे ई-चलन भरा’ म्हणणारे ॲप ठरतेय फसवे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 16:15 IST2025-12-27T16:14:43+5:302025-12-27T16:15:43+5:30
- ई-चलन एपीके फाईलद्वारे मोबाइल हॅक; अनेकांना फसवणुकीचा फटका

सावधान..! ‘तुमच्या गाडीचे ई-चलन भरा’ म्हणणारे ॲप ठरतेय फसवे
केडगाव : ‘तुमच्या गाडीचे चलन भरा’ असा मेसेज किंवा ॲप लिंक पाठवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी नवा प्रकार सुरू केला असून, ई-चलनाच्या नावाखाली पाठवण्यात येणारी एपीके फाईल मोबाइल हॅक करत असल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. दौंड तालुक्यातील केडगाव येथील एका पोलिसाच्या मोबाइलवर व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे ई-चलनाची एपीके फाईल प्राप्त झाली. चलन आले आहे का, दंड किती आहे, याची माहिती पाहण्यासाठी त्यांनी सदर फाईल उघडली. मात्र, ती फाईल ओपन करताच मोबाइलमध्ये परस्पर तीन संशयास्पद ॲप्लिकेशन्स इन्स्टॉल झाली आणि काही क्षणातच मोबाइलचा संपूर्ण ताबा सायबर भामट्यांनी घेतला.
यानंतर संबंधित पोलिस अधिकाऱ्याच्या मोबाइलमधून त्यांच्या मित्र-परिवाराला ‘मी हॉस्पिटलमध्ये आहे, तातडीने पैशांची गरज आहे’ असे मेसेज पाठवले जाऊ लागले. व्हॉट्सॲपचा डीपी बदलण्यात आला होता. तसेच, फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचा मोबाइल क्रमांक देऊन त्या नंबरवर पैसे पाठवण्याचे आवाहन केले. असाच प्रकार कुरकुंभ (ता. दौंड) येथील एका संगणक शिक्षकाच्या मोबाइलसोबतही घडला. त्यांच्याही मोबाइलमधून मित्रांना आर्थिक मदतीचे मेसेज पाठवण्यात आले. काही मित्रांनी पैसेही पाठवले; तर काहींनी तत्काळ फोन करून मोबाइल हॅक झाल्याची माहिती दिली. त्यानंतर संबंधित व्यक्तींनी स्टेटसद्वारे नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, माहीत नसलेल्या लिंक, ॲप किंवा एपीके फाईल्स उघडू नयेत अथवा इन्स्टॉल करू नयेत, असे आवाहन यवतचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी केले आहे. तसेच, अशा संशयास्पद फाईल्स इतरांना फॉरवर्ड करू नयेत आणि कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी खात्री करूनच पावले उचलावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. सायबर फसवणूक वाढत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असून, संशयास्पद प्रकार आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-----------
सायबर सेफ्टी : स्वतःला कसे सुरक्षित ठेवाल?
फक्त अधिकृत ॲप्सच डाउनलोड करा- गुगल प्ले स्टोअर किंवा अधिकृत सरकारी संकेतस्थळाशिवाय कुठलेही ॲप इन्स्टॉल करू नका.
ई-चलनाची खात्री करा- ई-चलनाची माहिती फक्त परिवहन, महा ट्रॅफिक किंवा अधिकृत एसएमएसद्वारेच तपासा.
अनोळखी लिंक/फाईल उघडण्यापूर्वी विचार करा - एपीके, पीडीएफ, झिप अशा फाईल्स संशयास्पद असू शकतात.
दोन स्तरांची सुरक्षा वापरा - व्हॉट्सॲप, ई-मेल, बँकिंग ॲप्ससाठी दोन टप्प्यांची सुरक्षा सुरू ठेवा.
मोबाइल लॉक व ॲप लॉक वापरा - पॅटर्न/पिन/फिंगरप्रिंटने मोबाइल सुरक्षित ठेवा.
संशयास्पद प्रकार दिसताच तत्काळ कारवाई करा - मोबाइल हॅक झाल्याची शंका आल्यास इंटरनेट बंद करा व तज्ज्ञांची मदत घ्या.
-----------
हे टाळा :
व्हॉट्सॲप/टेलिग्रामवर आलेल्या एपीके फाईल्स उघडू नका.
‘तुमचे चलन भरा’ असा घाईचा मेसेज आल्यास लगेच प्रतिसाद देऊ नका.
ओटीपी, बँक तपशील, यूपीआय पिन कोणालाही सांगू नका.
संशयास्पद मेसेज पुढे फॉरवर्ड करू नका.
ओळखीचा नंबर असला तरी पैशांची मागणी खात्रीशिवाय मान्य करू नका.
फसवणूक झाल्यास काय करावे? -
तत्काळ सायबर क्राईम हेल्पलाईन १९३० वर कॉल करा.
www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा.
जवळच्या पोलिस ठाण्यात माहिती द्या.
बँक/यूपीआय ॲप तत्काळ ब्लॉक करा.
सरकारी यंत्रणा कधीही एपीके फाईल पाठवत नाहीत. त्यामुळे अशा फाईल्स म्हणजे फसवणूकच समजावी.