सामान्यांच्या आरोग्याची काळजी ना पालिकेला, ना लोकप्रतिनिधींना; मगर हॉस्पिटलमधील बेड धूळखात, एक्स-रे मशीन बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 13:05 IST2025-08-14T13:04:46+5:302025-08-14T13:05:14+5:30
हडपसरच्या नागरिकांना उपचारासाठी मोठ्या प्रमाणात पैसे होताहेत खर्च; सामान्यांच्या आरोग्याची ना पालिकेला, ना लोकप्रतिनिधींना काळजी

सामान्यांच्या आरोग्याची काळजी ना पालिकेला, ना लोकप्रतिनिधींना; मगर हॉस्पिटलमधील बेड धूळखात, एक्स-रे मशीन बंद
- जयवंत गंधाले
हडपसर :पुणे महापालिकेच्या अण्णासाहेब मगर हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या काळापासून बंद अवस्थेत असलेले ३६ बेड या ठिकाणी आहेत. त्याच प्रमाणे बंद अवस्थेतील ऑक्सिजन प्लांटदेखील आहेत. करोडो रुपयांची एक्स-रे मशीन या ठिकाणी धूळखात पडलेली आहे. याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष आहे.
या एक्स-रे मशीनच्या शेजारी टेबलवर आम्हाला २०२२ आणि २०२३ या वर्षामध्ये नागरिकांनी जे एक्स-रे काढलेले आहेत. याचे रिपोर्ट या ठिकाणी तशाच अवस्थेत पडलेले आहेत. हडपसरच्या नागरिकांना उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करावे लागतात. महापालिकेकडून नागरिकांना उपचार मिळावेत, नामपात्र पैशांमध्ये एक्स-रे काढून मिळावेत, अशी येथील जनतेची गेल्या पाच वर्षापासून मागणी आहे. परंतु याकडे महापालिकेचा आरोग्य विभाग, हडपसर क्षेत्रीय कार्यालय आणि आरोग्यप्रमुख यांचं दुर्लक्ष झाल्याचे चित्र आज पाहायला मिळते.
ससाणेनगर नागरिक कृती समिती तसेच अनेक लोकसेवक तसेच संघटनांनी अनेक वेळा खासदार अमोल कोल्हे आणि आमदार यांच्याकडे लेखी मागणी केली की या दोन एकर क्षेत्र असलेल्या जागेमध्ये अत्याधुनिक प्रकारचे हॉस्पिटल उभे करावे. सर्व सोयींनी सज्ज असे रुग्णालय या ठिकाणी उभे करावे, अशी मागणी त्यांनी केलेली असतानाही महापालिका केवळ निधी नाही असे उत्तर देते. समितीचे मयूर फडतरे, हिरालाल अग्रवाल, उत्तम खंडागळे आणि दिलीप गायकवाड यांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणला.
जीव गमवावा लागला
हडपसर येथे सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण मृत्युमुखी पडल्याची नोंद झाली आहे. येथे रुग्णांना ना बेड मिळत होते, ना ऑक्सिजन. पालिकेची जबाबदारी असताना नागरिकांना या गलथान कारभाराने जीव गमावावा लागला आहे.
आपण चित्रीकरण करण्यासाठी व फोटो काढण्यासाठी कुणाची परवानगी घेतली. आम्हाला काम खूप असते. तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही आणि वेळही नाही. - डॉ. स्मिता ससाणे, हॉस्पिटल प्रमुख
या सर्व प्रकरणाची ताबडतोब खात्यांतर्गत चौकशी करून जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. एक्स-रे मशीन आणि बेड ताबडतोब चालू करण्यात येतील. - डॉ. नीना बोराडे, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी