Pune News : हॉटेलमध्ये जेवायला जाताय सावधान;सूपमध्ये झुरळ सापडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 17:58 IST2025-07-11T17:55:27+5:302025-07-11T17:58:16+5:30
- हाॅटेल मालकासह व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल

Pune News : हॉटेलमध्ये जेवायला जाताय सावधान;सूपमध्ये झुरळ सापडले
पुणे : हाॅटेलमध्ये कुटुंबासह जेवण करण्यासाठी गेलेल्या एका महिलेला दिलेल्या सूपमध्ये झुरळ सापडल्याची घटना उघडकीस आली कॅम्प परिसरातील एका हाॅटेलमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी लष्कर पोलिसांकडून संबंधित हाॅटेल मालक तसेच व्यवस्थापक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अश्विनी रवी शिरसाठ (३१, रा. दापोडी, मुंबई-पुणे रस्ता) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भिवंडी दरबार हाॅटेलचा व्यवस्थापक अमन हुसेन शेख (२४, रा. आझादनगर, भिवंडी) याच्यासह मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरसाठ कुटुंबीय हे गेल्या महिन्यात १६ जून रोजी कॅम्प परिसरातील भिवंडी दरबार हाॅटेलमध्ये रात्री जेवण करण्यासाठी गेले होते. त्यांनी जेवण मागवले. जेवण सुरू करण्यापूर्वी त्यांना सूप देण्यात आले. तेव्हा शिरसाठ यांना दिलेल्या सूपमध्ये झुरळ आढळले. या घटनेनंतर शिरसाठ यांनी हाॅटेल व्यवस्थापकासह कामगारांना जाब विचारला. तेव्हा त्यांनी सारवासारव केली.
हाॅटेल व्यवस्थापकाने किचनमध्ये स्वच्छतेची कोणतीही दक्षता घेतली नाही तसेच ग्राहकांच्या आरोग्याला हानी होईल, असे खाद्यपदार्थ दिल्याचे शिरसाठ यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २७५ अन्वये (ग्राहकांना भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्री करणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी कुंभार पुढील तपास करत आहेत.
या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार आली होती. आम्ही संबंधित हाॅटेलमधील सूप अन्न आणि औषध प्रशासनाकडे (एफडीए) तपासणीसाठी पाठवले होते. याबाबतचा अहवाल मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. - गिरीश दिघावकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लष्कर पोलिस ठाणे