Baramati : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसह भाजपची नगराध्यक्ष, नगरसेवक पदांची यादी अद्याप गुलदस्त्यातच;इच्छुकांचे जीव टांगणीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 10:32 IST2025-11-16T08:45:53+5:302025-11-16T10:32:52+5:30
सहाव्या दिवशी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांसह महायुतीचा प्रमुख घटकपक्ष असणाऱ्या भाजपने नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांची यादी अद्यापपर्यंत गुलदस्त्यातच ठेवली आहे. त्यामुळे इच्छुकांचे जीव टांगणीला

Baramati : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसह भाजपची नगराध्यक्ष, नगरसेवक पदांची यादी अद्याप गुलदस्त्यातच;इच्छुकांचे जीव टांगणीला
बारामती – बारामती नगरपरिषद निवडणुकीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र सलग सहाव्या दिवशी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांसह महायुतीचा प्रमुख घटकपक्ष असणाऱ्या भाजपने नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांची यादी अद्यापपर्यंत गुलदस्त्यातच ठेवली आहे. त्यामुळे इच्छुकांचे जीव टांगणीला लागले आहेत. प्रमुख पक्षांनी उमेदवारी जाहीर करताना सावध भूमिका घेतल्याचे चित्र आहे.
बारामती नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही. तर नगरसेवक पदासाठी शनिवारी (दि. १५) केवळ १७ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारी नगराध्यक्षपदासाठी बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र राज्य महासचिव काळुराम चौधरी यांनी अर्ज दाखल केला. गुरुवारी नगराध्यक्षपदासाठी आणि नगरसेवक पदासाठी एक अर्ज दाखल झाला आहे. आजअखेर नगराध्यक्ष पदासाठी एकूण ३ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. तसेच नगरसेवक पदासाठी शनिवारपर्यंत २४ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष, इंडियन नॅशनल काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी तसेच अपक्षांचा समावेश आहे.
त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांच्या निर्णयाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. त्यासाठी इच्छुकांनी अक्षरशः देव पाण्यात ठेवले आहेत. महायुती एकत्र निवडणूक लढविण्याची भूमिका घेणार का, यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा होणार का, यावरच महायुतीची निवडणुकीची गणिते अवलंबून आहेत. तसेच भाजप स्वबळावर लढण्याच्या चर्चेलाही बारामतीत जोर आला आहे. भाजपच्या वतीने या पार्श्वभूमीवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
तसेच शरद पवार गट तुतारी चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते यांनी जाहीर केले होते. तसेच नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी इच्छुकांचे अर्ज मागविल्याचेही सूचित केले होते. मात्र शरद पवार गटाने देखील अद्याप नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी एकही अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे बारामतीत शरद पवार आणि अजित पवार गटाची युती होणार की अजित पवार गट आणि भाजपची, नेमकी कोणाची युती होणार, यावर राजकीय गणिते अवलंबून आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रणनीतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी बेरजेच्या राजकारणाची गणिते आखली आहेत.
सोमवार हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने तो बारामतीच्या स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. याच दिवशी बारामतीच्या स्थानिक राजकारणात नवीन राजकीय समीकरणे अस्तित्वात येण्याची दाट शक्यता आहे. बारामतीकरांच्या मात्र ‘कोण होणार बारामतीचा कारभारी?’ याकडेच नजरा लागल्या आहेत.
दरम्यान, महायुतीच्या एकनाथ शिंदे शिवसेना गटाने आणि महाविकास आघाडीच्या काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने निवडणूक लढविण्याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे शहरात बारामतीकरांना दुरंगी अथवा तिरंगी लढत पाहावयास मिळण्याचे संकेत आहेत.
… उमेदवार निश्चितीसाठी अजित पवार बारामतीत
बारामती नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवक पदांच्या इच्छुकांची निवड करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवार (दि. १५) पासून बारामतीत आहेत. दिवसभर उपमुख्यमंत्री पवार यांच्या सहयोग निवासस्थानी उमेदवारांची निवड करण्यासाठी बैठका सुरू होत्या. यामध्ये पवार हे योग्य उमेदवारांची चाचपणी करण्यात व्यस्त होते. तसेच शरद पवार यांनीदेखील याबाबत स्थानिकांना अधिकार दिल्याचे स्पष्ट केले आहे.