बराक ओबामांनाही पडली ‘पसायदान’ची भुरळ..! २०२५ च्या ‘फेव्हरेट’ गाण्यांच्या यादीत माऊलींच्या रचनेचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 11:16 IST2025-12-24T11:14:57+5:302025-12-24T11:16:03+5:30
या जागतिक स्तरावरील यादीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या अजरामर 'पसायदान' या रचनेचा समावेश झाला आहे.

बराक ओबामांनाही पडली ‘पसायदान’ची भुरळ..! २०२५ च्या ‘फेव्हरेट’ गाण्यांच्या यादीत माऊलींच्या रचनेचा समावेश
- भानुदास पऱ्हाड
आळंदी : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे त्यांच्या वाचन आणि संगीताच्या आवडीसाठी जगभरात ओळखले जातात. दरवर्षीप्रमाणे त्यांनी २०२५ सालासाठी जाहीर केलेल्या त्यांच्या आवडत्या गाण्यांच्या यादीने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे, या जागतिक स्तरावरील यादीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या अजरामर 'पसायदान' या रचनेचा समावेश झाला आहे.
बराक ओबामा दरवर्षी त्यांच्या सोशल मीडियावरून वर्षभरातील त्यांच्या आवडत्या चित्रपटांची, पुस्तकांची आणि गाण्यांची यादी प्रसिद्ध करतात. यावर्षीच्या यादीत भारतीय अध्यात्म आणि साहित्याचा ठेवा असलेले 'पसायदान' झळकल्याने जगभरातील मराठी बांधवांमध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. पसायदान हे केवळ एक काव्य नसून विश्वात्मक कल्याणासाठी केलेली प्रार्थना आहे. ओबामांसारख्या जागतिक नेत्याने याची दखल घेतल्याने या प्रार्थनेचा संदेश आता जागतिक स्तरावर पोहोचला आहे.
ओबामांनी ही यादी शेअर केल्यापासून सोशल मीडियावर 'माऊली' आणि 'पसायदान' या विषयांची जोरदार चर्चा सुरू आहे. मराठी साहित्यातील या अमूल्य ठेव्याची भुरळ पाश्चिमात्य जगालाही पडत असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
नेमके काय आहे पसायदान?...
संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' या ग्रंथाच्या शेवटी अखिल विश्वाच्या कल्याणासाठी देवाकडे जे मागणं मागितलं, त्याला 'पसायदान' म्हणतात. "जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो..." या ओळींतून त्यांनी जगातील दुष्टपणा संपून सर्वांचे कल्याण व्हावे, अशी उदात्त भावना व्यक्त केली आहे. बराक ओबामा यांच्या या पसंतीमुळे भारतीय संस्कृती आणि मराठी साहित्याची मान पुन्हा एकदा जगात उंचावली आहे.