Baba Adhav passes away : बाबा म्हणाले, टीव्ही नको, भाकरी हवी..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 11:27 IST2025-12-10T11:26:40+5:302025-12-10T11:27:43+5:30
साधारण ७२ किंवा ७३ साल असेल. मी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो. एका कंपनीने मला पुण्यातील वसाहतींमध्ये देण्यासाठी म्हणून १२ दूरचित्रवाणी संच दिले. घराघरात टीव्ही येण्याचा हा काळ होता.

Baba Adhav passes away : बाबा म्हणाले, टीव्ही नको, भाकरी हवी..!
साधारण ७२ किंवा ७३ साल असेल. मी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो. एका कंपनीने मला पुण्यातील वसाहतींमध्ये देण्यासाठी म्हणून १२ दूरचित्रवाणी संच दिले. घराघरात टीव्ही येण्याचा हा काळ होता. नाना पेठेतील एका वसाहतीत मी टीव्हीचे लोकार्पण ठेवले. त्यादिवशी यशवंतराव चव्हाण पुण्यात होते. त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम ठेवला. अगदी वेळेवर चव्हाण साहेब आले. त्यांच्यासमवेत वसंतराव नाईक, मोहन धारिया, शरद पवार अशी बडी मंडळीही होती. सगळे येतच होते, तर बाबा आढाव त्यांच्यासमोरच उभे. समवेत सगळे हमाल, कष्टकरी वर्ग.
उंच केलेल्या हातात भाकरी. ‘टीव्ही नको भाकरी हवी’ अशा घोषणा. बाबांना पाहून साहेब थांबले. त्यांना जवळ बोलावले. तुमच्याशी शंभर टक्के सहमत आहे, असे सांगितले. भाकरी तर हवीच, पण आधुनिक तंत्रज्ञानही आपल्या लोकांना समजायला हवे. आपण दोन्हींसाठी प्रयत्न करत आहोत, त्याची गती वाढवू, असे सांगत चव्हाण साहेबांनी बाबांचे हात हातात घेतले व आंदोलन संपले. डॉ. बाबा आढाव हा माणूस असा होता. भांडणारा व प्रेमही तेवढेच करणारा. १९४८ मध्ये त्यांनी नागरी सहकारी भांडार काढले होते. सतत गरीब, कष्टकरी वर्गांमध्येच त्यांची ऊठबस असायची.
त्यांच्यासमोर मी विद्यार्थी होतो. बाबा माझ्या शाळेसमोरच्याच ताराचंद रुग्णालयात असायचे. माझे मामा रामभाऊ भोसले व बाबांचे मोठे भाऊ रामभाऊ आढाव हे दोघे मित्र. त्यावेळी आमचा परिसर संमिश्र होता. धार्मिक दृष्टीने व राजकीय दृष्टीनेही. आमचा संत कबीर चौक काँग्रेसला मानणारा. बबनराव पडवळ वगैरे काँग्रेसची मोठी मंडळी इथलीच. थोडे पुढे गेले की, साखळीपीर तालीम म्हणजे भाई टिळेकर, बाबूराव चोरगे या कम्युनिस्टांचा अड्डा व बाबांचा दवाखाना होता ती डोके तालीम म्हणजे समाजवादी, संयुक्त प्रजा समाजवादी यांचा कंपू तिथे असायचे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असे सगळेच. या सगळ्यांमधील कष्टकरी वर्गाची वसाहत म्हणजे नाना पेठेतील हे सगळे चौक.
मी विद्यार्थी असलो तरी बाबांना सतत पहायचो. त्यांचा दवाखाना म्हणजे गरीब रुग्णांसाठी संजीवनीच होता. बाबा बरेचदा पैसे घ्यायचेच नाहीत. या माणसाला बहुधा जन्मापासूनच गरीब, कष्टकरी वर्गाबद्दल कणव असावी. कारण बाबा सतत त्यांचे प्रश्न घेऊन संघर्ष करतानाच दिसायचे. पुढे मी महाविद्यालय व नंतर काँग्रेसचा सक्रिय कार्यकर्ता झालो. बाबा समाजवादी पक्षाचे. पण माझा त्यांचा संपर्क कायम असायचा. त्यांच्याकडून मला राजकारणातील व समाजकारणातील बरेच काही शिकायला मिळाले. प्रश्नांची जवळून ओळख झाली. ते शांतपणे कसे सोडवायचे याची शिकवण मिळाली. मुख्य म्हणजे कठीण प्रसंगांचा सामना कसा करायचा याचे धडे मिळाले.
बाबांना अखेरचे पाहिले ते आत्ता मागच्याच महिन्यात. समता भूमी या त्यांच्या आवडत्या परिसरात ते उपोषणाला बसले होते. वय वर्षे ९५. असाध्य आजार जडलेला. त्यांना म्हटले, ‘अहो या वयात कशाला आता दगदग करता?’ म्हणाले, ‘अरे उल्हास, जे काही चालले आहे ते पाहून सतत अस्वस्थ वाटते. स्वस्थ बसू तरी कसा? कसा काळ पाहिला, कसे नेते पाहिले मी! समंजसपणा होता, समोरच्याचे ऐकून घेण्याची वृत्ती होती. देश, देशाची घटना याबद्दल संवेदना होत्या. हे काहीच नसताना दिसत असेल तर घरात स्वस्थ बसू तरी कसा?’ या सर्वांचा वारसा आपल्याला मागे ठेवून देहरूपाने बाबा गेले. आता त्यांनी दाखवून दिलेल्या वाटेवरून चालत राहणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली. - उल्हास पवार, माजी आमदार, ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते