खेड तालुक्यातील अश्विनी केदारीचे निधन; PSI परीक्षेत मुलींमध्ये पहिली आलेली विद्यार्थिनी कायमची हरपली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 20:00 IST2025-09-07T19:56:35+5:302025-09-07T20:00:48+5:30
पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावून राज्यभर नावलौकिक मिळवला होता.

खेड तालुक्यातील अश्विनी केदारीचे निधन; PSI परीक्षेत मुलींमध्ये पहिली आलेली विद्यार्थिनी कायमची हरपली
राजगुरुनगर : खेड तालुक्यातील पाळू येथील शेतकरी कुटुंबातील अश्विनी बाबुराव केदारी (वय ३०) हिने २०२३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावून राज्यभर नावलौकिक मिळवला होता. परंतु, गेल्या महिन्यात घडलेल्या अपघातानंतर सुरू असलेली तिची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली.
अधिकच्या माहितीनुसार, २८ ऑगस्ट रोजी पहाटे अभ्यास करताना तिने अंघोळीसाठी पाणी तापवायला ठेवले होते. पाणी जास्त तापल्याचे पाहण्यासाठी गेली असता बाथरूममध्ये हिटरचा धक्का बसून उकळते पाणी अंगावर सांडले. या अपघातात अश्विनी तब्बल ८० टक्के भाजली होती. तत्काळ तिला पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल काही दिवस मृत्यूशी लढा दिल्यानंतर अखेर उपचारादरम्यान तिचे निधन झाले.
अश्विनीच्या उपचारासाठी मोठा खर्च होत असल्याने खेड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. अनेकांनी पुढाकार घेत तिला मदत केली होती. मात्र, सर्वांच्या प्रयत्नांनंतरही तिचे आयुष्य वाचवता आले नाही. अश्विनीला जिल्हाधिकारी होण्याचे मोठे स्वप्न होते. त्या दिशेने ती प्रयत्नशील होती. परंतु दुर्दैवाने तिचे स्वप्न अपूर्ण राहिले. तिच्या निधनाने संपूर्ण खेड तालुका आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांत शोककळा पसरली आहे.