हडपसरमध्ये अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई; तृतीयपंथीसह दोघे जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 15:04 IST2025-10-30T15:04:31+5:302025-10-30T15:04:45+5:30
- मांजरी ते १५ नंबर चौक रस्त्यावर एक महिला आणि तृतीयपंथी संशयास्पदरीत्या थांबलेले दिसले.

हडपसरमध्ये अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई; तृतीयपंथीसह दोघे जेरबंद
पुणे : अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, कोल्हापूर कृती विभागाच्या पथकाने हडपसर परिसरात धडक कारवाई करत तीन अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली. या कारवाईत ३ लाख ८७ हजार रुपयांचे मेफेड्रॉन (एमडी) आणि एकूण ४ लाख ३१ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मेघा दीपक जगताप (२७, रा.महादेव नगर, हडपसर), तृतीयपंथी स्नेहल उर्फ गणेश शिवसांब बाचे (२१, रा.पॅराडाइज सोसायटी, ससाणेनगर, हडपसर) आणि सलमान सलीम शेख (रा.घोरपडे पेठ, हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे अधिकारी आणि अंमलदार हडपसर, वानवडी व काळेपडळ परिसरात पेट्रोलिंग करत असताना, मांजरी ते १५ नंबर चौक रस्त्यावर एक महिला आणि तृतीयपंथी संशयास्पदरीत्या थांबलेले दिसले. त्यांना ताब्यात घेऊन अंगझडती व घरझडतीत सुमारे ६० ग्रॅम ८ मिलीग्रॅम वजनाचे ३ लाख ४०० रुपयांचे एमडी, दोन वजन काटे, दोन मोबाइल फोन आणि टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी असा एकूण ४ लाख ३१ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चौकशीत आरोपी मेघा जगताप हिने एमडी पदार्थ सलमान सलीम शेख (रा.घोरपडे पेठ, पुणे) याच्याकडून घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर, पोलिसांनी सलमान शेख यास ताब्यात घेत अटक केली. या तिघांविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात एनडीपीएस ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रेमा पाटील या करत आहेत. ही कामगिरी अपर पोलिस महासंचालक सुनील रामानंद, विशेष पोलिस महानिरीक्षक शारदा राऊत, उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील, पोलिस अधीक्षक एम.एम. मकानदार, अपर अधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.