चौफुला कला केंद्रातील गोळीबार प्रकरणी आणखी एकाला घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 09:31 IST2025-07-30T09:30:38+5:302025-07-30T09:31:11+5:30
- ‘लोकमत’च्या दणक्यानंतर पोलिसांची कारवाई: गाेळी कोणी चालवली हे अस्पष्टच

चौफुला कला केंद्रातील गोळीबार प्रकरणी आणखी एकाला घेतले ताब्यात
पुणे: दौंड तालुक्यातील वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्रातील गोळीबार प्रकरणात आरोपीची आदलाबदल झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २७ जुलैला प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पोलिसांनी धावपळ करत अखेर या गेाळीबारप्रकरणी आणखी मारूंजीचे माजी उपसरपंच हिरामण ऊर्फ काळू युवराज बुचडे (रा. मारुजी) यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आरोपींची संख्या आता पाचवर पोहोचली आहे.
न्यू अंबिका कला केंद्रामध्ये झालेल्या गोळीबार तब्बल ३६ तासांनंतर समाजमाध्यमांच्या रेट्यामुळे पोलिसांना उघड करावा लागला. यामध्ये आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह गणपत जगताप, चंद्रकांत मारणे, रघुनाथ आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, त्यामध्ये एका आरोपीची अदलाबदल केल्याची चर्चा सुरु झाली होती. तरीही पोलिस यामध्ये केवळ चारच आरोपी असल्यावर ठाम होते. ‘लोकमत’ने गोळीबाराचा तपास संशायाच्या भोवऱ्यात असे वृत्त २७ जुलैला प्रसिद्ध केले. अन् पोलिसांची धावपळ सुरू झाली. प्रकरण मिटवण्यासाठी दबावतंत्राचा अजूनही वापर सुरू आहे. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर यवत पोलिसांनी मंगळवारी (दि.२९) पहाटे हिरामन बुचडे यांना मारूंजी येथून ताब्यात घेतले आहे. पूर्वी यामध्ये केवळ चौघांचाच समावेश असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. परंतु, पोलिसांची लपवाछपवी फार काळ काही टिकली नाही. अखेर बुचडे यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
कला केंद्रात गोळीबार नेमका कोणी केला हेही अद्यापर्यंत पोलिसांनी स्पष्ट सांगितलेले नाही. तपास सुरू असल्याचे कारण देत चालढकल करण्याचा प्रकार सुरू आहे. काहीजण म्हणतात बाळासाहेब मांडेकर यांनी गोळीबार केला तर गणतप जगताप म्हणतो मी गोळी चालवली तर पोलिस म्हणतात एवढेच आरोपी आहेत. यामुळे हे संपूर्ण प्रकरण आणि तपास संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे.
ती दुसरी फॉर्च्युनर कोणाची
न्यू अंबिका कला केंद्रात झालेल्या गोळीबार प्रकरणाची माहिती अद्यापही स्पष्टपणे समोर आली नाही. रोज नवीन माहिती समोर येत आहे. भांडाभोड झाल्यानंतर पोलिसांनी बुचडेला ताब्यात घेतले. त्यानंतर या संशयितांनी वापरलेले वाहनदेखील जप्त केले. मात्र, त्या ठिकाणी अजून एक फॉर्च्युनर असल्याची चर्चा सुरू आहे. ती काेणाची आहे याबाबत अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहे. पोलिसांना याबाबत माहिती मिळाली असेल की नाही याबाबत साशंकताच व्यक्त होत आहे. कारण आधीच एका संशयिताला अभय तसेच कला केंद्राला अभय देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात आता ही नवी फॉर्च्युनर यामुळे संपूर्ण तपासच चक्रावणारा ठरत आहे.