...अन् थोडक्यात बचावले चहाप्रेमी;फांदी तोडली एका झाडाची,कोसळले दुसरेच झाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 16:30 IST2025-07-16T16:29:12+5:302025-07-16T16:30:28+5:30
दुपारची वेळ... चहाप्रेमी चहा पित उभे होते... जवळच धोकादायक झाडाची फांदी तोडण्याचे काम सुरू होते. तोडलेली फांदी खाली पडत आहे, हे निश्चिंतपणे ते लोक पाहात होते.

...अन् थोडक्यात बचावले चहाप्रेमी;फांदी तोडली एका झाडाची,कोसळले दुसरेच झाड
वानवडी : दुपारची वेळ... चहाप्रेमी चहा पित उभे होते... जवळच धोकादायक झाडाची फांदी तोडण्याचे काम सुरू होते. तोडलेली फांदी खाली पडत आहे, हे निश्चिंतपणे ते लोक पाहात होते. ते पाहात असतानाच त्यांच्या शेजारीच झाड पडले. त्यामुळे या चहाप्रेमींची चांगलीच पळापळ झाली. ही घटना वानवडीतील परमार नगरमध्ये घडली.
परमारनगर या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या कमानीवर धोकादायकरीत्या झुकलेल्या झाडांच्या फांद्या कापण्याचे काम महापालिकेकडून सुरू होते. यावेळी जवळच पन्नास फुटांवर चहाच्या दुकानाबाहेर चहाप्रेमी निश्चिंत होऊन चहाचा घोट घेत फांद्या तोडण्याचे सुरू असलेले काम पाहात उभे होते. तोालेली फांदी खाली पडली, त्याकडे लक्ष असतानाच तोडलेल्या फांदीवरील केबल वायरच्या तानामुळे चहाच्या दुकानासमोरील मोठे झाड अचानक कोसळले. ते पाहून चहाप्रेमींची पळापळ झाली. सुदैवाने अचानक कोसळलेले झाड चहा दुकानाच्या बाजूला कोसळले नाही, अन्यथा मोठी हानी झाली असती, असे येथील उपस्थितांनी सांगितले.
वडाचे झाड धोकादायकरित्या झुकलेल्या स्थितीत आहे. ते कधीही पडून मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याने तेथील सामाजिक कार्यकर्त्यांनी धोकादायक फांद्या काढण्याची तक्रार महापालिकेकडे केली होती.या तक्रारींची दखल घेत महापालिकेच्या उद्यान विभागाकडून धोकादायक फांद्या काढण्याचे काम सुरू होते. यावेळी झाडांवरील वायरमुळे जवळच असलेले दुसरे झाड कोसळले. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृक्ष प्राधिकरणाचे विजय नेवसे यांनी सांगितले.