पुणे - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आले असून गुरुवारी रात्री त्यांचे शहरात आगमन झाले. आज (शुक्रवार, दि. ४) सकाळी ११:३५ वाजता एनडीएमधील श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अनेक मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे मात्र या कार्यक्रमावर बाजीराव मस्तानी यांचे आठवे वंशज शादाब अली बहादुर पेशवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. मात्र या अनावर सोहळ्याला उशिरा निमंत्रण मिळाल्याने आणि व्यासपीठावर जागा न मिळाल्याने बाजीराव मस्तानी यांचे आठवे वंशज शादाब अली बहादुर पेशवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
‘शेर का बच्चा शेर होता है या बकरी का बच्चा शेर होता है?’ असा प्रश्न विचारत थेट आयोजकांवर त्यांनी निशाणा साधला आहे. ज्या पुष्कर पेशव्यांना अमित शहा यांच्या सोबत व्यासपीठावर बसण्याची संधी दिली ते दत्तक पुत्र आहेत.’ असेही ते म्हणाले. मी बाजीराव पेशव्यांचा रक्ताचा वंशज आहे. मला अशा प्रकारे दिलेली वागणूक अमित शहा यांना देखील आवडणार नसल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली.