राजकारणात संकुचित विचार नकोत, दिलदारपणा वाढवा; बारामतीत अजित पवारांचा कार्यकर्त्यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 13:42 IST2025-11-14T13:41:17+5:302025-11-14T13:42:19+5:30
बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती गुरुवारी बारामतीत घेण्यात आल्या. यानंतर झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते. भाषणादरम्यान एका कार्यकर्त्याने त्या काळातील राजकीय परिस्थितीची आठवण करून देणारी चिठी दिली, त्यावर पवार नाराज झाले.

राजकारणात संकुचित विचार नकोत, दिलदारपणा वाढवा; बारामतीत अजित पवारांचा कार्यकर्त्यांना इशारा
बारामती : “खासदाकीला, आमदाकीला असं काही सांगू नका. शेवटी सगळे बारामतीकर आपलेच मतदार आहेत. एका बाजूला आदरणीय पवारसाहेब, दुसऱ्या बाजूला मी - अजित पवार. त्यामुळे बारामतीकरांपुढे प्रश्न उभा राहणं स्वाभाविक आहे. पण, आपण मनाचा मोठेपणा ठेवायला हवा,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला.
बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती गुरुवारी बारामतीत घेण्यात आल्या. यानंतर झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते. भाषणादरम्यान एका कार्यकर्त्याने त्या काळातील राजकीय परिस्थितीची आठवण करून देणारी चिठी दिली, त्यावर पवार नाराज झाले. ते म्हणाले, “अरे, जरा दिलदारपणा वाढवा. कालपर्यंत आपण एकत्र होतो. मला सुरुवातीला निवडून द्यायला पवारसाहेब कारणीभूत होते, मी काय वरून पडलो का? हे विसरून चालणार नाही. काहींचं चुकलं असेल, त्यांना मुख्य प्रवाहात आणा. झालं गेलं गंगेत गेलं. आपल्याला अजून खूप पुढे जायचं आहे.”
पवार पुढे म्हणाले, “बारामती नगरपरिषदेचं गेल्या दहा वर्षांत उत्पन्न ३१० कोटी होतं. पण, विकासकामांसाठी तब्बल ३,३०० कोटींचा निधी आणण्यात यश आलं. हे बारामतीकरांच्या पाठिंब्यामुळे शक्य झालं. नगराध्यक्ष, नगरसेवक, स्वीकृत नगरसेवक अशा ४६ जागांसाठी आज ३२५ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. सर्वचजण ताकदीचे आहेत. मात्र, नवे व्हिजन असणाऱ्यांना स्थान देण्याचा मानस आहे.”
“मी कामाचा माणूस आहे, विकासाचा भोक्ता आहे. उमेदवारी न मिळाल्यास नाराजी दाखवू नका. गटतट, हेवेदावे बाजुला ठेवा आणि पक्षाच्या विजयासाठी एकदिलाने काम करा. निवडणुकीत बोलणारे अनेक असतील. पण, काम करणारा फक्त अजित पवार आहे,” असंही त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं.
दरम्यान, नगराध्यक्ष व नगरसेवकपदाच्या उमेदवारांची नावं जाहीर होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, अजित पवार यांनी “नावे लवकरच फायनल करू,” असे सांगत उमेदवारांच्या नावांवरचा ‘सस्पेन्स’ कायम ठेवला.