विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 18:53 IST2025-12-31T18:49:09+5:302025-12-31T18:53:19+5:30

सोहळ्याच्या नियोजनासाठी प्रशासन सज्ज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

pune news administration ready for Vijaystambh salute ceremony; District Collector Jitendra Dudi gave information | विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

पुणे : पेरणे फाटा येथे गुरुवारी (दि. १ जानेवारी) आयोजित करण्यात आलेला विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांतता आणि उत्साहात साजरा व्हावा, यासाठी आवश्यक सर्व सुविधा प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्याची पूर्वतयारी करण्यात आली आहे. तसेच सोहळ्याच्या नियोजनासाठी प्रशासन सज्ज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

डुडी म्हणाले, ‘यावर्षी अधिक अनुयायी येण्याचे गृहित धरून सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. सर्व अनुयायांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, म्हणून प्रशासन योग्य ती दक्षता घेत आहे. नियोजन करताना विविध संघटना आणि नागरिकांच्या सूचनाही लक्षात घेण्यात आल्या आहेत.’

जिल्हा परिषदेकडून २३ आरोग्य केंद्रे, ४३ रुग्णवाहिका, १८ खासगी रुग्णालयांतील २८६ खाटा आरक्षित, १५५ प्रशिक्षित मनुष्यबळ, उपहारगृह व टँकरकरिता ३३ तपासणी पथके, ८० घंटागाड्या, शुद्ध पाण्याच्या व्यवस्थेसाठी १५० टँकर्स, पाणी भरण्याच्या ठिकाणी २०० कर्मचारी नियुक्त, २ हजार ८०० शौचालये, २६५ सफाई कामगार, २६० पर्यवेक्षण अधिकारी व कर्मचारी, ९ हिरकणी कक्ष आदी सुविधा करण्यात आल्या आहेत.

पुणे शहर पोलिस आयुक्तालयाकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १ महानिरीक्षक, ३ पोलिस उपमहानिरीक्षक, २० पोलिस उपायुक्त दर्जाचे अधिकारी, ८ राज्य राखीव पोलिस दल तुकड्या, ३ शीघ्र प्रतिसाद दल, १४ घातपातविरोधी पथके, १८ बीडीडीएस पथके, ६५० होमगार्ड, ४ हजार ७०० पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. संपूर्ण सोहळ्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता फेस रिकग्नायजेशनकरिता २५१ ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. १९ ठिकाणी वाहनतळाच्या माध्यमातून २० हजार चारचाकी वाहनाची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर पोलिस आयुक्तालयातर्फे ४ पोलिस उपायुक्त, ८ सहायक पोलिस उपायुक्त, ४५ पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक एकूण १७१, १ हजार ३२५ अंमलदार, वार्डन व होमगार्ड एकूण ६५०, २ सर्व्हेलन्स व्हॅन, ३ आरसीपी आणि १ शीघ्र प्रतिसाद दलातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

शिरुर तालुक्यातील वढू बु. येथील छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गोपाळ महाराज यांच्या समाधीस्थळी अनुयायी दर्शनासाठी येतात. या दृष्टीने गर्दीवर नियंत्रण आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता जिल्हा पोलिस अधीक्षक ग्रामीण कार्यालयाकडून कायदा व सुवव्यस्थेच्या दृष्टीने कोरेगाव भीमा, वढु. बु. व शिक्रापूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत बंदोबस्ताकरिता ३३ वरिष्ठ पोलिस अधिकारी, ३३२ इतर पोलिस अधिकारी, ३ हजार १० पोलिस अंमलदार, १ हजार ५०० होमगार्ड, ४ राज्य राखीव पोलिस दल तुकड्या, १० स्ट्रायकिंग फोर्स, ४ आरसीपी पथक, २ शीघ्र प्रतिसाद दल आणि ७ बीडीडीएस पथके नेमण्यात आली आहेत.

सुरक्षेच्या व निगराणीच्या दृष्टीने पोलिस विभागामार्फत सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे तसेच ध्वनीक्षेपण यंत्रणा आदी सुविधा करण्यात आली आहे. वाहनतळाचे ठिकाण, पिकअप व ड्रॉपचे ठिकाण, वॉच टॉवर्स, पोलिस मदत केंद्र, वज्र मोबाईल आदी व्यवस्था करण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशमन दल, रुग्णवाहिका तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथके आदी यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पीएमपीकडून एकूण १ हजार २६० बसचे नियोजन केले आहे.

बार्टीतर्फे एकूण ३१० बुक स्टॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विजयस्तंभाला फुलांची सजावट, विद्युत रोषणाई, परिसर डागडुजी, पत्रकार कक्ष, मंडप, परिसर सुशोभीकरण आदी व्यवस्था करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग, महावितरणकडून परिसरात विद्युत पुरवठा करण्यात आला आहे.

Web Title: pune news administration ready for Vijaystambh salute ceremony; District Collector Jitendra Dudi gave information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.