Pune news : रुबी हॉलमधील किडनी रॅकेटप्रकरणी कारवाईची प्रतीक्षाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 19:23 IST2026-01-25T19:22:53+5:302026-01-25T19:23:20+5:30
- चौकशी समितीचा ४७० पानी अहवाल सादर होऊन महिना उलटला

Pune news : रुबी हॉलमधील किडनी रॅकेटप्रकरणी कारवाईची प्रतीक्षाच
पुणे : शहरातील रुबी हॉल क्लिनिक येथील उघडकीस आलेल्या अवैध किडनी रॅकेटप्रकरणी अद्याप ठोस कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून शासनाने नेमलेल्या १० सदस्यीय चौकशी समितीने तब्बल ४७० पानांचा चौकशी अहवाल राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे २४ डिसेंबरला सादर करून आता महिना लोटला आहे. मात्र, या अहवालावर आधारित कारवाईबाबत अद्याप प्रतीक्षा कायम आहे.
चौकशी समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यासह समिती सदस्यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी अहवालाबाबत सविस्तर चर्चा केली होती. यावेळी आरोग्यमंत्री यांनी पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊन चौकशी अहवालाच्या आधारे योग्य ती कठोर कार्यवाही करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतरही अद्याप ठोस निर्णय किंवा कारवाई जाहीर न झाल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीने काम पाहिले. राज्य सरकारने रुबी हॉल क्लिनिक येथे घडलेल्या किडनी रॅकेटप्रकरणी सविस्तर चौकशी करण्यासाठी ही समिती स्थापन केली होती. समितीने ३ ऑक्टोबरपासून चौकशीचे कामकाज सुरू केले होते. चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक आणि गंभीर बाबी समोर आल्या आहेत.
चौकशी अहवालानुसार अमित अण्णासाहेब साळुंखे किडनी रिसीव्हर असून, त्यांच्या पत्नीऐवजी सारिका गंगाराम सुतार यांना बनावट पत्नी म्हणून किडनीदाता दाखविण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच किडनी देण्याच्या व्यवहारात ठरलेली रक्कम न मिळाल्याने किडनी दात्याची बहीण कविता कोळी यांनी हेल्पलाइन क्रमांक १०० वर तक्रार करून रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यास थांबविल्याची बाबही चौकशीत स्पष्ट झाली आहे.
या अहवालामुळे राज्यातील अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेतील त्रुटी, गैरप्रकार व देखरेखीअभावी निर्माण झालेल्या गंभीर समस्यांवर प्रकाश पडला आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषींवर नेमकी कधी आणि कोणती कारवाई होणार, याकडे वैद्यकीय क्षेत्रासह सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
---
रुग्णालय, डॉक्टर्स, एजंट, किडनीदाता, रिसीव्हर आदींची सखोल चौकशी
या प्रकरणात समितीने शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर्स, रुबी हॉल क्लिनिकमधील कागदपत्रे तयार करणारे कर्मचारी व एजंट, किडनीदाता व किडनी घेणारा रुग्ण, स्टेट ऑथरायझेशन समितीचे सदस्य, ससून सर्वोपचार रुग्णालयातील संबंधित अधिकारी, गुन्हे शाखा क्रमांक २ पुणे येथील पोलिस निरीक्षक, प्रथम खबर देणारे, होगाडे (सांगली) तसेच प्रारंभीच्या चार सदस्यीय चौकशी समितीतील अधिकाऱ्यांची सखोल तपासणी व उलट तपासणी केली आहे.
----
अधिकाऱ्यांचे सचिव कार्यालयाकडे बोट
या प्रकरणातील दोषींवर कारवाईबाबत विचारणा केली असता ते सचिव कार्यालयाकडे अंगुली निर्देश करत आहेत. आरोग्य विभागाने महापालिका निवडणुकीपूर्वी चौकशी अहवाल सादर झाल्याची व पंधरा दिवसांत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. मात्र, महिना उलटल्यानंतरही दोष निश्चिती व कारवाईबाबत कोणत्याच हालचाली होताना दिसत नसल्याने कठोर कारवाई होणार का? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.