भीमा नदीत मुबलक पाणी… पण वीज रात्रीची..! शिरूर तालुक्यातील शेतकरी त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 10:01 IST2025-12-10T10:00:47+5:302025-12-10T10:01:03+5:30
अवकाळी पाऊस, रोगराई, बाजारभावाचा अभाव आणि आता रात्रीचा वीजपुरवठा या सर्व संकटांनी शेतकरी कोलमडून गेले आहेत. ‘पाणी आहे… पण वीज नाही!’ अशी हाक शेतकऱ्यांच्या तोंडी ऐकू येत आहे.

भीमा नदीत मुबलक पाणी… पण वीज रात्रीची..! शिरूर तालुक्यातील शेतकरी त्रस्त
रांजणगाव सांडस : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातून वाहणाऱ्या भीमा–मुळा–मुठा नद्यांत पाणी मुबलक असतानाही विजेच्या अनियमित पाळीमुळे या भागातील शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळत नाही. अवकाळी पाऊस, रोगराई, बाजारभावाचा अभाव आणि आता रात्रीचा वीजपुरवठा — या सर्व संकटांनी शेतकरी कोलमडून गेले आहेत. ‘पाणी आहे… पण वीज नाही!’ अशी हाक शेतकऱ्यांच्या तोंडी ऐकू येत आहे.
भीमा नदीकाठच्या बहुतांश गावांना ग्रामस्थांच्या मागणीमुळे दिवसा वीज उपलब्ध केली जाते. मात्र आलेगाव पागा, राक्षेवाडी, रांजणगाव, सांडस परिसरातील पठारे, शिंदे, कोळपे वस्ती, शितोळे, बारवकर, दुबे वस्ती या भागांना रात्री नऊ ते पहाटे पाच या वेळेतच थ्री-फेज वीज दिली जाते. बिबट्यांचा वावर असल्याने या वेळेत शेतात जाणे धोकादायक ठरते. त्यामुळे शेतकरी रात्रीच पाणी सोडून ठेवतात आणि पहाटे महिला मजुरांना घेऊन कांदालागवड करत आहेत.
दिवसा आठ तास वीज असली तरी ती वारंवार खंडित होते. परिणामी मोटर बंद पडणे, पाइपलाइनला गळती लागणे या समस्यांवर अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. भीमा नदीवरील बंधारे तुडुंब भरलेले असतानाही विजेच्या अनियमित पाळीमुळे पाणी शेतीपर्यंत पोहोचत नाही.
आर्थिक गणित बिघडले
अवकाळी पावसामुळे अनेकांचे काढणीला आलेले कांदापीक पाण्यातच गेले. वखारीतील थोडाफार साठाही खराब झाला. यामुळे कांदा उत्पादकांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. शासनाने पंचनामे केले असले तरी अद्याप एकाही शेतकऱ्याच्या खात्यात मदत जमा झालेली नाही, अशी खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.
तालुक्यातील जवळपास सर्व गावांना दिवसा वीज मिळते. मग रांजणगाव सांडस–राक्षेवाडी भागालाच रात्रीची पाळी का? वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी एक दिवस तरी शेतकऱ्यांबरोबर रात्री लागवड करून पाहावी. - रोहिणी काळभोर, ग्रामपंचायत सदस्या
खर्च करून पीक घेतो, पण वीज अनियमित, बाजारभाव नाही; अशा परिस्थितीत शेतकऱ्याचा संसार कसा चालणार? - सतीश राक्षे-पाटील, कांदा उत्पादक.