पोलिस, महापालिका व जिल्हा प्रशासनाची संयुक्त समिती ठेवणार पब, बारवर नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 19:42 IST2025-08-22T19:41:30+5:302025-08-22T19:42:04+5:30
प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन या अस्थापनांकडून वारंवार होत आहे. रात्री उशिरापर्यंत हे पब, बार व रेस्टॉरंट चालू ठेवले जातात.

पोलिस, महापालिका व जिल्हा प्रशासनाची संयुक्त समिती ठेवणार पब, बारवर नजर
पुणे : कल्याणीनगर, कोरेगाव पार्क व मुंढवा परिसरातील नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या पब, बार व रेस्टॉरंटवर नजर ठेवण्यासाठी आणि नियमांचे उल्लंघन केल्यानंतर कारवाई करण्यासाठी पोलिस, महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली संयुक्त समिती निर्माण करण्यात आली आहे. या समितीची पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी घोषणा केली असून, दर पंधरा दिवसांनी कारवाईचा अहवाल देण्याचे आदेश या समितीला दिले आहेत.
कल्याणीनगर, कोरेगाव पार्क व मुंढवा परिसरात मोठ्या प्रमाणात पब, बार व रेस्टॉरंट आहेत. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन या अस्थापनांकडून वारंवार होत आहे. रात्री उशिरापर्यंत हे पब, बार व रेस्टॉरंट चालू ठेवले जातात. त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. नियम पाळण्यासंदर्भात प्रशासनाकडून वारंवार आव्हान करूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.
या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी यावर शाश्वत उपाययोजना करण्यासाठी या आस्थापनांना शिस्त लावण्यासाठी परिमंडळ चार चे पोलिस उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये उपाध्यक्ष म्हणून वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त, सचिव म्हणून येरवडा विभागाचे सहायक पोलिस आयुक्त तर सदस्य म्हणून महापालिका, जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि त्या परिसरातील प्रमुख नागरिक यांचा समावेश असेल. या समितीने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढले आहेत.
ही समिती खालील कामे करणार -
- कल्याणीनगर, कोरेगाव पार्क व मुंढवा परिसरातील पब, बार व रेस्टॉरंट वेळेचे उल्लंघन करून उशिरापर्यंत सुरू ठेवले आहेत का?
- सीसीटीव्ही संदर्भातील नियमांचे पालन केले जात आहे का ?
- वाहन पार्किंगसाठी पुरेशी जागा आहे का?
- संध्याकाळी, विशेषतः आठवड्याच्या शेवटी परिसरात वाहतूक कोंडी होते का?
- परवानगी नसलेल्या ठिकाणी दारू विक्री केली जाते का?
- रूफ टॉपवर संगीत वाजवले जात आहे का? त्याचा रहिवाशांना त्रास होतो का ?
- येथील संगीत बाहेर ऐकू येते का?
- या आस्थापनांनी कोणत्याही नियमाचे उल्लंघन केल्यास मालकांसह व्यवस्थापकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी.
महापालिकेची जबाबदारी -
महापालिका आयुक्त या समितीवर योग्य अधिकाऱ्याची नेमणूक करणार. इमारतीच्या आराखड्याचे उल्लंघन झाले आहे का हे तपासून उल्लंघन झाल्याचे आढळल्यास ते पाडले जाईल. वापरात बदल झाल्यास, पार्किंगच्या जागेचा इतर कारणांसाठी वापर केल्यास कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांकडे तक्रार दाखल करेल.