पुणे शहर २०३० पर्यंत जागतिक दर्जाचे शहर घडवण्याकरिता केला ऐतिहासिक संकल्प..!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 11:15 IST2025-07-30T11:14:17+5:302025-07-30T11:15:15+5:30

'पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोलॅबोरेटिव्ह रिस्पॉन्स' आयोजित चर्चासत्रातील सूर; विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

pune news A historic resolution has been made to make Pune a world-class city by 2030..! | पुणे शहर २०३० पर्यंत जागतिक दर्जाचे शहर घडवण्याकरिता केला ऐतिहासिक संकल्प..!  

पुणे शहर २०३० पर्यंत जागतिक दर्जाचे शहर घडवण्याकरिता केला ऐतिहासिक संकल्प..!  

पुणे : पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलत, 'पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोलॅबोरेटिव्ह रिस्पॉन्स' यांच्यातर्फे आयोजित प्रभावी चर्चासत्रात 'पुणे व्हिजन २०३०' अधिकृतपणे सुरू करण्यात आले. शहरातील सरकार, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तींना एकत्र आणणारी ही सार्यकाळ पुण्याला २०३० पर्यंत जागतिक दर्जाचे, शाश्वत आणि समावेशक शहर बनवण्याच्या सामूहिक संकल्पाचा प्रारंभ ठरली.

या चर्चासत्राला केंद्रीय सहकार राज्यमंत्री आणि नागरी हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार, उद्योजक अभय भुतडा, लोकमतचे वरिष्ठ महाव्यवस्थापक मिलन दर्डा यांच्यासह विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ उपस्थित होते.

डॉ. सुधीर मेहता आणि मनोज पोचट यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या संवादात पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी २०३० पर्यंतच्या बदलांवर सखोल चर्चा झाली. शहराच्या पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, वाहतूक, गुन्हेगारी आणि सामाजिक समावेशकता यासंबंधी अनेक सूचना मांडण्यात आल्या. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरातील स्वच्छता आणि पायाभूत सुविधांवरील आव्हानांवर भाष्य केले. रस्त्यावरील कचरा, खड्डे आणि पदपथावरील अडथळ्यांचा सामना करण्यासाठी कारवाई सुरू आहे. स्वच्छतेसाठी योजना आखल्या असून, पुणे कचरामुक्त करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. यापूर्वीही पुण्यात काम करण्याचा अनुभव त्यांनी सांगितला आणि आता पुन्हा तितक्याच प्रभावीपणे काम करण्याचा मानस व्यक्त केला. चर्चासत्रात वरील सर्व मान्यवरांनी मौलिक सूचना केल्या.

पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी वाहतूक आणि गुन्हेगारीच्या समस्यांवर नियंत्रणासाठी पोलिसांचे प्रयत्न अधोरेखित केले."अनेक गुन्ह्यांचा छडा २४ तासांत लावला आहे.मनुष्यबळ वाढवण्यासाठी आणि नवीन पोलिस ठाण्यांसाठी सरकारकडे प्रस्ताव सादर केले आहेत. पुणेकरांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिस कायम कटिबद्ध असून, वाहतूक समस्येवरही काम सुरू आहे," असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
 
व्यावसायिकांनी दीर्घकालीन सामाजिक गुंतवणूक करणे ही काळाची गरज : उद्योजक अभय भुतडा

आरोग्य, शिक्षण आणि क्रीडा ही क्षेत्रे केवळ मूलभूत गरजा नाहीत, तर समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पाया आहेत. ही जबाबदारी आता फक्त शासनाची नाही, तर प्रत्येक व्यावसायिकाने यात दीर्घकालीन सामाजिक गुंतवणूक करणे काळाची गरज असल्याचे भुतडा यांनी नमूद केले. पुण्याला २०३० पर्यंत जागतिक दर्जाचे मॉडेल शहर बनवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचा करायला हवे. पर्यावरणाला प्राधान्य देत पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योजक, प्रशासन आणि नागरिकांनी एकमेकांच्या साथीने पुढे जावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन
 
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे विद्यापीठाला जागतिक पातळीवर अव्वल स्थान मिळवून देण्याचा मनोदय व्यक्त केला. प्राध्यापकांच्या नियुक्त्या लवकरच होणार असून, परदेशी तज्ज्ञांना शिकवण्याची संधी देण्यासाठी उद्योजकांनी विद्यापीठात निधी गुंतवणुकीचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजक आणि प्रशासन यांच्यातील सहकार्य महत्त्वाचे आहे.

 
पायाभूत सुविधा हव्या

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर भक्कम पायाभूत सुविधांची गरज अधोरेखित केली. रिंगरोड, मेट्रो विस्तार आणि नव्या विमानतळाच्या उभारणीसारख्या प्रकल्पांची जलद आणि दर्जेदार अंमलबजावणीवर प्रशासकीय पातळीवर काम सुरू आहे. पुण्याच्या प्रगतीत नागरी विमान वाहतुकीची भूमिका वाढवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. पुणेकरांच्या सहकार्याने शहराच्या विकासात सकारात्मक बदल घडवण्याचा दृढ संकल्प आहे.

सर्वांची भागीदारी असावी

विकासासाठी नागरिक, प्रशासन, आणि उद्योगजगताचे सहकार्य अपरिहार्य असल्याचे या चर्चासत्रात अधोरेखित केले. पुणे भौगोलिकदृष्ट्या वाढत नाही, तर ते एक सजीव शहर म्हणून जागृत होत आहे. ही वाढ समावेशक, पर्यावरणपूरक असली पाहिजे, असा सूर यावेळी निघाला.

Web Title: pune news A historic resolution has been made to make Pune a world-class city by 2030..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.