रस्त्याअभावी चिमुकल्याचा जीव गेला; खेतेपठारमध्ये आदित्यच्या मृत्यूने हळहळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 16:00 IST2026-03-19T15:59:40+5:302026-03-19T16:00:24+5:30
- वाढदिवसानंतर दुसऱ्याच दिवशी दुर्दैवी घटना; ४ किमी पायी प्रवासानंतरही उपचारांपूर्वी मृत्यू

रस्त्याअभावी चिमुकल्याचा जीव गेला; खेतेपठारमध्ये आदित्यच्या मृत्यूने हळहळ
भीमाशंकर (पुणे जि. ): जुन्नर-आंबेगाव सीमेवरील दुर्गम खेतेपठार भागात दोन वर्षांच्या आदित्य विकास घनकुटे या चिमुकल्याच्या मृत्यूने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. वाढदिवसाचा आनंद साजरा केल्यानंतर अवघ्या एका दिवसातच या निरागस जिवाचा अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
रविवारी (ता. १५) रात्री आदित्यचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला होता. सोमवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे खेळत होता. मात्र, सकाळी १० वाजता जेवताना अचानक ठसका लागून तो बेशुद्ध पडला. काही वेळाने शुद्धीवर आला, पण प्रकृती चिंताजनक झाल्याने कुटुंबीयांनी तातडीने दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला.
मात्र गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने आई सुनीता आणि आजी शारदा यांनी आदित्यला पाठीवर घेऊन सुमारे चार किलोमीटरचा डोंगर उतार पायी पार केला. आमोंडी येथे पोहोचल्यानंतर काका दत्तात्रय खमसे यांनी दुचाकीवरून त्याला घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात नेले. परंतु, उपचार सुरू असतानाच आदित्यचा मृत्यू झाला. “वेळेत रस्ता आणि उपचार मिळाले असते, तर माझा मुलगा वाचला असता,” अशी हृदयद्रावक प्रतिक्रिया वडील विकास घनकुटे यांनी दिली.
दुर्गम भागातील वास्तव उघड
जुन्नर-आंबेगाव सीमेवरील खेतेपठार आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. वैष्णवधाम (ठाकरवाडी) येथील कच्चा रस्ता पावसाळ्यात वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत उपचार मिळणे कठीण ठरत आहे.
ग्रामस्थांचा संताप
“देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली, तरी आमच्या गावाला रस्ता नाही. निवडणुका आल्या की आश्वासने दिली जातात; पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. आज आदित्य गेला, उद्या कोणाचा नंबर येईल सांगता येत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ तुकाराम भांगरे यांनी दिली. “रस्ता कोणत्याही मार्गाने होऊ द्या, वाद नकोत. आमच्यासाठी तो जीवदान ठरेल. वेळेत उपचार न मिळाल्यास अनेकांचे जीव जातील,” असे लहु गिजरे यांनी सांगितले.
प्रशासनासमोर मोठा प्रश्न
या घटनेने दुर्गम भागातील रस्त्यांच्या अभावाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तातडीने पक्का रस्ता व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.