- योगेश गायकवाड
कुरुळी : चिंबळी हद्दीत इंद्रायणी नदीवर लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेला पर्यायी पूल आजही वाहतुकीसाठी बंदच आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंनी जोडरस्ते न झाल्याने हा पूल केवळ शोभेची वास्तू ठरला असून नागरिकांना आजही जीव धोक्यात घालून धोकादायक के. टी. बंधाऱ्यावरूनच प्रवास करावा लागत आहे. या गंभीर परिस्थितीमुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
“पूल पूर्ण झाला आहे. मात्र, तो सुरू होण्यासाठी नेमका कोणता मुहूर्त पाहिला जात आहे? अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल चिंबळी व परिसरातील ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. लाखो रुपये खर्चून उभारलेली सार्वजनिक सुविधा वापरात न आणणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, शेतीसाठी पाणीसाठा उपलब्ध व्हावा या उद्देशाने मोशी–चिंबळी हद्दीत इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेल्या के.टी. बंधाऱ्यांची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या बंधाऱ्यावरून पायी व दुचाकीने मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असून बंधाऱ्याची अवस्था अत्यंत जीर्ण झाली आहे.
बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंनी असलेले सिमेंटचे संरक्षक कठडे तुटलेले आहेत. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून कडेला असलेली माती, मुरूम व दगड वाहून गेल्याने काही भागात खोल भगदाडे तयार झाली आहेत. त्यामुळे वाहन घसरून थेट नदीत पडण्याचा धोका वाढला आहे.
या मार्गावरून चिंबळी, मोशी परिसरातील शेतकरी, कामगार, विद्यार्थी व ग्रामस्थांची रोजची ये-जा असते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत, विशेषतः रात्रीच्या वेळी या बंधाऱ्यावरून प्रवास करणे अत्यंत जीवघेणे ठरत आहे. मोठा अपघात होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. चिंबळी हद्दीत बांधण्यात आलेला पर्यायी पूल सुरू झाल्यास चिंबळी ते आळंदी–देहू रस्ता हा महत्त्वाचा वाहतूक दुवा अधिक सुलभ होऊ शकतो. तसेच चिंबळी फाटा परिसरातील सततची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, पूल पूर्ण असूनही तो वाहतुकीसाठी खुला न केल्याने नागरिकांची गैरसोय वाढत आहे.
पर्यायी पूल तत्काळ वाहतुकीसाठी खुला करा
सध्या चिंबळी फाटा येथील वाहतूक कोंडी ही वाहनचालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. पर्यायी पूल सुरू झाल्यास के. टी. बंधाऱ्यावरचा ताण कमी होऊन अपघातांचे प्रमाणही घटू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर के. टी. बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, बंधाऱ्याचे मजबुतीकरण करावे तसेच नवीन सुरक्षा कठडे उभारावेत, अशी जोरदार मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर चिंबळी हद्दीतील पर्यायी पूल तत्काळ वाहतुकीसाठी खुला करून संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित व ठोस कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.