जिल्ह्यातील साडेचार हजार शिक्षक अखेर कार्यमुक्त;शिक्षकांना आजपासून नवीन शाळेत रुजू होण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 15:19 IST2025-10-15T15:17:55+5:302025-10-15T15:19:28+5:30
- ऑनलाइन बदलीचा गोंधळ संपला: अंमलबजावणीत विलंब होऊ न देण्याचे आदेश

जिल्ह्यातील साडेचार हजार शिक्षक अखेर कार्यमुक्त;शिक्षकांना आजपासून नवीन शाळेत रुजू होण्याचे आदेश
जेजुरी : पुणे जिल्ह्यातील ऑनलाइन बदली प्रक्रियेत सहभागी झालेल्या सुमारे ४,५०० प्राथमिक शिक्षकांना अखेर कार्यमुक्तीचा आदेश मिळाला आहे. अनेक दिवस शिक्षक संघटनांच्या सतत पाठपुरावा आणि न्यायालयीन सुनावणीनंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला. ‘लोकमत’ने ६ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केलेल्या ‘जिल्ह्यातील बदली झालेले साडेचार हजार शिक्षक कार्यमुक्तीच्या प्रतीक्षेत’ या बातमीतील अंदाज खरा ठरला असून, या निर्णयामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी ऑनलाइन बदल्या झालेल्या सर्व शिक्षकांना त्यांच्या विद्यमान शाळांमधून १३ ऑक्टोबर रोजी कार्यमुक्त करून १४ ऑक्टोबर रोजी नवीन शाळांमध्ये रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयात ‘बदली नको’ प्रकरणातील शिक्षकांच्या अर्जांवर ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने बदली प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने कार्यमुक्तीचे आदेश जारी केले आहेत.
कार्यमुक्ती झाल्यानंतर शिक्षकांनी नवीन ठिकाणी रुजू होऊन तत्काळ माहिती ऑनलाइन प्रणालीत नोंदवावी, कार्यमुक्ती व रुजू अहवाल संबंधित केंद्रप्रमुखांनी दोन दिवसांच्या आत जिल्हा परिषदेला पाठवावेत, बदली प्रक्रियेच्या अंमलबजावणीत कोणताही विलंब होऊ नये असे स्पष्ट आदेश प्रशासनाने दिले आहेत.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील साडेचार हजार शिक्षकांच्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आहे. शिक्षक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत करत, “न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर प्रशासनाने योग्य निर्णय घेतला,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, दुसरीकडे या प्रक्रियेत काही अनियमितता आणि दुर्लक्षित मुद्द्यांमुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह
पदोन्नतीमुळे रिक्त होणाऱ्या जागा बदली पात्र शिक्षकांना मिळाल्या नाहीत, त्यामुळे अनेक शिक्षकांना हक्काच्या जागांपासून वंचित राहावे लागले. मुंबई उच्च न्यायालयाने ‘बदली नको’ म्हणणाऱ्या शिक्षकांना अर्ज सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार ७ ऑक्टोबरला सुनावणी झाली. मात्र, जिल्हा परिषदेने या शिक्षकांनाही बदली झालेल्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे एकीकडे बदली शिक्षकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला असला, तरी बदली प्रक्रियेतील अनियमितता आणि दुर्लक्षित मुद्द्यांमुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.