नगर परिषद, पंचायतीच्या निवडणुकीसाठी अध्यक्ष, नगरसेवक पदांसाठी आतापर्यंत ४४९ अर्ज, आता उरले शेवटचे दोन दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 12:50 IST2025-11-16T12:43:39+5:302025-11-16T12:50:43+5:30
- जिल्ह्यातील १४ नगर परिषदा आणि तीन नगर पंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी निवडणूक होत असून, उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले आहेत. अध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी आतापर्यंत ४४९ अर्ज आले आहेत. हे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येत होते.

नगर परिषद, पंचायतीच्या निवडणुकीसाठी अध्यक्ष, नगरसेवक पदांसाठी आतापर्यंत ४४९ अर्ज, आता उरले शेवटचे दोन दिवस
पुणे : जिल्ह्यातील १४ नगर परिषदा आणि तीन नगर पंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी निवडणूक होत असून, उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले आहेत. अध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी आतापर्यंत ४४९ अर्ज आले आहेत. हे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येत होते. आता मात्र, ऑफलाइन पद्धतीने अर्थात समक्षही सादर करता येणार आहेत. संगणक प्रणालीत अडचणी येत असल्याने आणि उमेदवारांना समान संधी मिळावी म्हणून राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, नगरपरिषद, नगरपंचायतीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे तीन दिवस राहिले आहेत. अर्ज स्वीकारण्याची मुदत सोमवारी (दि. १७) तीन वाजेपर्यंत असून उमेदवारांना ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतींनी अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करता येणार आहे; तर रविवारी सार्वजनिक सुटी असली तरी अर्ज दाखल करता येणार आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत नगराध्यक्ष तसेच सदस्यपदासाठी ४४९ जणांचे अर्ज जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. सर्वाधिक अर्ज चाकण नगरपरिषदेसाठी आले आहेत. त्यात नगराध्यक्ष पदासाठी आठ अर्ज, तर नगरसेवक पदासाठी ६४ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्याखालोखाल राजगुरुनगर नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी तीन अर्ज, तर नगरसेवक पदासाठी ५४ अर्ज आले आहेत. आळंदी नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी सहा अर्ज, तर नगरसेवक पदासाठी ४८ अर्ज आले आहेत.
सासवड नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी पाच अर्ज, तर नगरसेवक पदासाठी ४० अर्ज आले आहेत. लोणावळा नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी एक अर्ज, तर नगरसेवक पदासाठी ३७ अर्ज आले आहेत. बारामती नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी दोन अर्ज, तर नगरसेवक पदासाठी २४ अर्ज आले आहेत. तसेच माळेगाव नगर पंचायतीच्या अध्यक्षपदासाठी एक अर्ज, तर नगरसेवक पदासाठी १६ अर्ज आले आहेत.