आसखेड : भामा आसखेड धरण परिसरात गतवर्षीच्या तुलनेत चौपट पावसाची नोंद झाली असून, एक महिन्यात सुमारे ३२९ मिलिमीटर पावसाची नोंद धरण परिसरात झाली असल्याची माहिती धरण प्रशासनाचे नीलेश घारे यांनी दिली.
दरम्यान, सततच्या पावसामुळे पेरण्या रखडून भातरोपाअभावी भात लावण्याही रखडल्या आहेत. तसेच गेल्या महिनाभरात झालेल्या दमदार पावसामुळे गतवर्षीच्या तुलनेत तिप्पट पाणीसाठा आजअखेर धरणात आहे.
सध्या ४३.०२ टक्के पाणीसाठा (गतवर्षी १३.९७ टक्के) धरणात असून, पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने दिवसभरात २४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. खेड, शिरूर, दौंडसह चाकण औद्योगिक वसाहत व पुणे पिंपरी चिंचवडलाही वरदान ठरणारे भामा आसखेड हे ८.१४ टीएमसीचे मातीचे धरण आहे. सध्या धरणात एकूण १०६.९३ दलघमी (३.७८ टीएमसी) उपयुक्त साठा ९३.४१७ दलघमी (३.३० टीएमसी) इतका साठा आहे.