पुणे : शहरात गेल्या चार वर्षांत तब्बल ३५२ माता मृत्यू झाले आहेत. त्यात सर्वाधिक माता मृत्यू २०२१-२२ या आर्थिक वर्षात १०३, तर सर्वांत कमी २०२४-२५ मध्ये ७० माता मृत्यू झाले आहेत. मागील वर्षभरात जीव गमावलेल्या मातांपैकी महापालिका क्षेत्रातील रहिवासी माता २६ असून, महापालिकेबाहेरील २५, इतर जिल्ह्यांतील १९ माता आहेत. विशेष म्हणजे, एकूण मातामृत्यूंपैकी ५२ मृत्यू हे दारिद्र्यरेषेच्या वर असलेल्या कुटुंबातील आहेत.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांअभावी उपचार करण्यास नकार दिल्याने गर्भवतीचा मृत्यू झाली. या घटनेनंतर माता मृत्यूचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आढावा घेतला असता माता मृत्यूचे वास्तव समाेर आले आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत शहरात ७० मातामृत्यू झाले. त्यातील ५२ दारिद्र्यरेषेच्या वरील आणि १५ दारिद्र्यरेषेच्या खालील आहेत. आणि ३ इतर आहेत. सर्वाधिक मृत्यू हे दारिद्र्यरेषेवरील आहेत.
आकडे काय सांगतात?आर्थिक वर्ष आणि माता मृत्यू दर
२०२१-२२ : १०३२०२२-२३ : ९०
२०२३-२४ : ८९२०२४-२५ : ७० मृतांमध्ये शिक्षित मातांची संख्या अधिक
मातामृत्यूंमध्ये अशिक्षित ५, आठवीपर्यंत शिक्षण झालेल्या १७ आणि आठवीपेक्षा जास्त शिक्षण झालेल्या ४५ होत्या. शिक्षणाचा तपशील माहिती नसलेल्या ३ माता आहेत. मृतांमध्ये आठवीपेक्षा जास्त शिक्षण झालेल्या मातांची संख्या अधिक आहे. पुण्यात आधीच्या वर्षात एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ मध्ये ८९ माता मृत्यू झाले होते. त्यात महापालिकेतील ३१, महापालिकेबाहेरील ३१, जिल्ह्याबाहेरील २६ आणि इतर राज्यांतील १ होते. मातामृत्यूंमध्ये दारिद्र्यरेषेवरील ६५ आणि दारिद्र्यरेषेखालील १४ मृत्यू होते. एकूण मातामृत्यूंमध्ये अशिक्षित १०, आठवीपर्यंत शिकलेल्या १४ आणि आठवीपेक्षा जास्त शिकलेल्या ५४ आणि शिक्षणाचे तपशील नसलेल्या २ माता होत्या.
कारण काय?मातामृत्यू झाल्यानंतर त्याची चौकशी महापालिकेच्या मातामृत्यू अन्वेषण समितीकडून केली जाते. त्यात मातेचा मृत्यू होण्याचे नेमके कारण समोर येण्यास मदत होते. त्यानुसार गेल्या आर्थिक वर्षभरात पुण्यात मृत्यू झालेल्या २२ प्रकरणांमध्ये कुटुंबीयांकडून महिलेला रुग्णालयात नेण्याचा निर्णय वेळेत घेतला गेला नसल्याचे निदर्शनास आले. याच वेळी रुग्णालयात पोहोचण्यास विलंबाचे केवळ एक प्रकरण आढळले. रुग्णालयात वेळेवर उपचार न झाल्याचे एकही प्रकरण आढळले नाही.
माता मृत्यू झाल्यानंतर त्याची चौकशी महापालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण समितीकडून केली जाते. या समितीमध्ये पालिकेचे वैघकीय अधिकारी, वरिष्ठ स्त्री रोगतज्ज्ञ, वरिष्ठ जनरल सर्जन, वरिष्ठ भूलतज्ज्ञ , आरसीएच अधिकारी याचा समावेश आहे. माता मृत्यूमध्ये महिलेला कुटुंबीयांनी वेळेत रुग्णालयात दाखल करण्याचा उशीर झाल्याचे कारण अधिक प्रमाणात आढळत आहे.- डॉ. नीना बोराडे, आरोग्यप्रमुख, महापालिका