“असं विधान कोणी कसं करू शकतं?”अंजली भारतीच्या वक्तव्यावर महिला आयोगाची गंभीर दखल
By किरण शिंदे | Updated: January 27, 2026 15:08 IST2026-01-27T15:05:51+5:302026-01-27T15:08:09+5:30
अशा प्रकारचे विधान करणाऱ्यांना राज्य महिला आयोगाकडून नोटीस पाठवण्यात येणार आहे

“असं विधान कोणी कसं करू शकतं?”अंजली भारतीच्या वक्तव्यावर महिला आयोगाची गंभीर दखल
पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांच्याबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधानामुळे राज्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गायिका अंजली भारती हिने एका कार्यक्रमादरम्यान बलात्कारासंदर्भात अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अमृता फडणवीस यांच्याविषयी केलेल्या विधानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून संबंधित व्यक्तींना नोटीस पाठवण्यात येणार असल्याचे संकेत आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “बलात्कारासारख्या घटनेचा निषेध करणे गरजेचे असताना ‘बलात्कार करा’ असे विधान करणे अत्यंत चुकीचे आणि धक्कादायक आहे. समाज बलात्कारासारख्या गुन्ह्यांविरोधात लढत असताना असे विधान कोणी कसे करू शकते?” संबंधित व्हिडिओ मी अद्याप पूर्णपणे ऐकलेला नाही. मात्र व्हिडिओ ऐकून या विधानामागचा नेमका उद्देश काय होता, याची सखोल माहिती घेतली जाईल. अशा प्रकारचे विधान करणाऱ्यांना राज्य महिला आयोगाकडून नोटीस पाठवण्यात येणार आहे.”
दरम्यान गायिका अंजली भारती हिच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करत संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. महिलांबाबत अशा प्रकारची भाषा वापरणे हे अस्वीकार्य असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.