पुणे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्याला पसंती! माजी महापौर प्रशांत जगताप यांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 09:30 IST2021-05-07T19:16:25+5:302021-05-08T09:30:41+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदाचा आमदार चेतन तुपे यांनी राजीनामा दिल्यानंतर बऱ्याच जणांनी या पदासाठी फिल्डिंग लावली होती.

पुणे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्याला पसंती! माजी महापौर प्रशांत जगताप यांची नियुक्ती
पुणे: पुणेराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदाचा आमदार चेतन तुपे यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार व अजित पवार नेमकी कुणाच्या हाती पक्षाची धुरा देतात याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले होते.अखेर माजी महापौर प्रशांत जगताप यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जगताप यांच्या नियुक्तीची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.
आगामी काळात होणाऱ्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रशांत जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब करताना मोठी जबाबदारी सोपविली आहे. जगताप यांनी महापौर, पीएमपीएल संचालक असे अनेक पदे भूषविली आहे. पुणे महापालिकेत जवळपास २१ वर्षांपासून त्यांना पालिकेतील कामाचा अनुभव आहे. २०१२ साली ते पहिल्यांदा नगरसेवक झाले. २०१६ ते २०१७ या कालावधी दरम्यान ते त्यांनी पुण्याचे महापौर पदाचा कार्यभार सांभाळला.सध्या ते पक्षाचे विद्यमान नगरसेवक आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करण्यात त्यांची हातोटी आहे. तसेच सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध देखील आहे. सुप्रिया सुळे यांचे जवळचे व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदासाठी दीपक मानकर, दत्ता धनकवडे,सचिन दोडके यांसारखी बऱ्याच नावांची चर्चा सुरू होती. मात्र अखेर पक्षाने महापालिकेतील सुसंस्कृत चेहरा व मन मिळाऊ स्वभाव असलेल्या नगरसेवक प्रशांत जगताप यांच्या नावाला पसंती दिली.