मतदार यादीतील दुबार नावांचे करायचे काय?पालिका प्रशासनाला पडला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 15:46 IST2025-12-05T15:45:43+5:302025-12-05T15:46:02+5:30
- दुबार नावे तीन लाखांपेक्षा अधिक असल्याची शक्यता

मतदार यादीतील दुबार नावांचे करायचे काय?पालिका प्रशासनाला पडला प्रश्न
पुणे : महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर २२ हजारांपेक्षा अधिक हरकती, त्रुटी नोंदविण्यात आल्या आहेत. या हरकतींची तपासणी करून आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याचे काम सुरू झाले आहे. आत्तापर्यंत महापालिकेने बारा हजारांहून अधिक हरकतींची दखल घेत यादी दुरुस्त केली आहे. प्रारूप मतदार यादीत तीन लाख मतदारांची दुबार नावे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र ही संख्या यापेक्षा अधिक असल्याची शक्यता आहे. या दुबार नावांचे करायचे काय? असा प्रश्न महापालिकेला पडला आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्यातील महापालिका आयुक्तांची बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे ही बैठक झाली. महापालिका आयुक्त नवल राम म्हणाले, राज्यातील इतर शहरांमधील मतदार यादीवर आलेल्या हरकतींची संख्या पाहता पुणे शहराची स्थिती चांगली आहे. काही शहरांमध्ये लोकसंख्येच्या निम्म्या प्रमाणात हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. मतदार यादीत दोनवेळा नावे असलेल्या दुबार मतदारांनी दोनदा मतदान करू नये, असे अपेक्षित आहे. दोन वेळा मतदान होऊ नये, यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, याचे नियोजन महापालिकेला करावे लागणार आहे. त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावे लागणार आहे.
दुबार नावे तीन लाखांपेक्षा अधिक असल्याची शक्यता
महापालिकेने तयार केलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये तीन लाख दुबार मतदारांची नावे असल्याची माहिती सुरुवातीच्या काळात समोर आली होती. मात्र ही संख्या यापेक्षा अधिक असल्याचे हळूहळू समोर येत आहे. त्यामुळे निवडणुकीत दुबार मतदारांनी मतदानाचा हक्क दोन वेळा बजावू नये, यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, यासाठी आवश्यक त्या सूचना देण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली आहे.