पुण्यातील नगरपरिषद निकालांनी ठरवली ‘दादांची’ ताकद; १७ पैकी १० नगराध्यक्ष राष्ट्रवादीकडे, शिवसेनेला ४, भाजपाला केवळ ३ नगराध्यक्षपदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 22:20 IST2025-12-21T22:20:32+5:302025-12-21T22:20:43+5:30
Maharashtra Local Body Election Results 2025: पुणे जिल्ह्यातील १४ नरगपरिषद आणि ३ नगरपंचायतींसाठी रविवारी (दि. २१) मतमोजणी पार पडली. यामध्ये पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण जिल्ह्याचे दादा असल्याचे दाखवून दिले आहे. आठ नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.

पुण्यातील नगरपरिषद निकालांनी ठरवली ‘दादांची’ ताकद; १७ पैकी १० नगराध्यक्ष राष्ट्रवादीकडे, शिवसेनेला ४, भाजपाला केवळ ३ नगराध्यक्षपदे
पुणे - जिल्ह्यातील १४ नरगपरिषद आणि ३ नगरपंचायतींसाठी रविवारी (दि. २१) मतमोजणी पार पडली. यामध्ये पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण जिल्ह्याचे दादा असल्याचे दाखवून दिले आहे. आठ नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेला ४ आणि भाजपाला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला एकही जागा न मिळाल्याने मोठी पिछेहाट झाल्याचे समोर आले आहे.
नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वत: रणांगणात उतरले होते. तर दुसरीकडे राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद उफाळून आला होता. काहींनी दुसरी चूल मांडली होती. त्यामुळे जिल्ह्यात घड्याळाची टिकटिक वाजणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. रविवारी झालेल्या मतमाेजणीमध्ये तब्बल १७ पैकी १० ठिकाणी राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. बारामतीमध्ये सचिन सातव यांनी विजय मिळवला आहे. इंदापूरला प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे भरत शहा विजयी झाले आहेत. त्यांनी बंडखोर प्रदीप गारटकर यांचा पराभव केला. शिरुर एश्वर्या पाचर्णे, लोणावळा, राजेंद्र सोनवणे, उरुळी देवाची संतोष सरोदे हे विजयी झाले आहेत. माळेगावमध्येही राष्ट्रवादीचाच वरचष्मा राहिला आहे.
सासवडला काँग्रेस मधून भाजपात आलेले संजय जगताप यांच्या मातोश्री आनंदी काकी जगताप विजयी झाल्या असून, त्यांच्या माध्यमातून भाजपापाचे जिल्ह्यातील खाते उघडले आहे. तर भाजपाला तळेगाव आणि आळंदी येथे विजय मिळवत, 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
दौंड, भोर, जेजुरी करिष्मा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करिष्मा करत जेजुरीत निवडणुकीपूर्वी जयदीप बारभाई यांच्यासह २० नगरसेवकांना राष्ट्रवादीत दाखल केले होते. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला असून नगराध्यक्षासह नगरपरिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. त्याचबरोबर दौंडमध्येही भाजपचे आमदार राहुल कुल आणि प्रेमसुख कटारिया यांच्या नागरिक हित संरक्षण मंडळ आणि मित्र पक्षाला जोरदार धक्का देत राष्ट्रवादीच्या दुर्गादेवी जगदाळे यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडली आहे. तर भोरमध्येही भाजपचा गड कमकुवत करत राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडकेर यांनी भोर नगरपरिषदेच्या चाव्या राष्ट्रवादीकडे घेण्यास यश मिळवल आहे. येथे रामचंद्र आवारे विजयी झाले आहेत.
शरद साेनवणेंनी शिवधनुष्य पेलले
जुन्नर, खेड, आंबेगाव आणि चाकण या ४ नगरपालिकांची जबाबदारी जुन्नरचे शिवसेनेचे आमदार शरद सोनवणे यांच्यावर देण्यात आली होती. या चारही नगरपालिकांवर शिवसेनेने भगवा फडकवून पक्षाची ताकद दाखवून दिले आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिष्ठेची केलेल्या मंचरच्या निवडणुकीतही शिवसेनेने बाजी मारत राजश्री गांजळे विजयी झाल्या आहेत.
जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदाचे चित्र
राष्ट्रवादी (अजित पवार गट)१०
शिवसेना (शिंदे गट) ४
भाजप ३
बारामती: सचिन सातव (राष्ट्रवादी अजित पवार गट)
लोणावळा: राजेंद्र सोनवणे (राष्ट्रवादी अजित पवार गट)
दौंड: दुर्गादेवी जगदाळे (राष्ट्रवादी अजित पवार गट)
शिरूर: ऐश्वर्या पाचर्णे (राष्ट्रवादी अजित पवार गट)
जेजुरी: जयदीप बारभाई (राष्ट्रवादी अजित पवार गट)
भोर: रामचंद्र आवारे (राष्ट्रवादी अजित पवार गट)
इंदापूर:भरत शहा (राष्ट्रवादी अजित पवार गट)
फुरसुंगी: संतोष सरोदे (राष्ट्रवादी अजित पवार गट)
वडगाव मावळ (नगरपंचायत): अबोली ढोरे (राष्ट्रवादी अजित पवार गट)
माळेगाव (नगरपंचायत): सुजय सातपुते (राष्ट्रवादी अजित पवार गट)
मंचर (नगरपंचायत): राजश्री गांजाळे (शिवसेना शिंदे गट)
चाकण: मनीषा गोरे (शिवसेना शिंदे गट)
जुन्नर: सुजाता काजळे (शिवसेना शिंदे गट)
राजगुरुनगर:मंगेश गुंडाळ (शिवसेना शिंदे गट)
तळेगाव दाभाडे: संतोष दाभाडे (भाजप)
आळंदी: प्रशांत कुऱ्हाडे (भाजप)
सासवड:आनंदी काकी जगताप (भाजप)
नगरपरिषदेतील नगरसेवकांचे पक्षीय बलाबल
एकूण ३४७
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) १६१
भाजप: ९९
शिवसेना (शिंदे गट) ५१
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ६
काँग्रेस ४
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) ३
कृष्णा भीमा विकास आघाडी ६
रासप १
बसप १
अपक्ष १४
सासवडी १ जागा न्यायालयीन निकालामुळे रिक्त.
नगरपंचायततील नगरसेवकांचे पक्षीय बलाबल
एकूण ५१
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ३०
भाजप ६
शिवसेना (शिंदे गट) ३
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) १
अपक्ष १०