होळीसाठी झाडे तोडल्यास एक लाखाचा दंड; पुणे महापालिकेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 15:57 IST2025-03-11T15:55:42+5:302025-03-11T15:57:00+5:30

शहरातील वनविभागाच्या हद्दीत असलेली, तसेच नदीकाठ आणि आसपासच्या परिसरातील झाडे काही दिवस आधीच तोडून ती विक्रीसाठी ठेवली जातात

Pune Municipal Corporation warns of fine of Rs 1 lakh for cutting down trees for Holi | होळीसाठी झाडे तोडल्यास एक लाखाचा दंड; पुणे महापालिकेचा इशारा

होळीसाठी झाडे तोडल्यास एक लाखाचा दंड; पुणे महापालिकेचा इशारा

पुणे: गेल्या काही वर्षांत शहराच्या अनेक भागात होळीसाठी वृक्षतोडीचे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. याची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने दंडात्मक नियमाची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे होळी सण साजरा करण्यासाठी काेणी वृक्षतोड केल्याचे आढळल्यास त्याच्याकडून १ लाखापर्यंत दंड वसूल केला जाईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.

शहरात गुरुवारी (दि. १३) होळी साजरी होणार आहे. होळीचा सण शहरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. होळीसाठी मोठ्या प्रमाणात गोवऱ्या, तसेच लाकडांचा वापर केला जातो. मात्र, शहरातील वनविभागाच्या हद्दीत असलेली, तसेच नदीकाठ आणि आसपासच्या परिसरातील झाडे काही दिवस आधीच तोडून ती विक्रीसाठी ठेवली जातात; अथवा गुपचूपपणे वापरली जातात. या पार्श्वभूमीवर महापालिकेने दंडात्मक कारवाई करण्याचा ईशारा दिला आहे.

महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) अधिनियम २०२१ या कायद्यानुसार, विनापरवाना झाडे जाळणे, तोडणे किंवा कोणत्याही प्रकारे झाडास हानी पोहचविणे, असे कोणतेही कृत्य करणे गुन्हा आहे. अशा गुन्ह्यासाठी शासनाच्या सूचनेच्या सूत्रानुसार काढलेल्या मूल्याइतके; परंतु एक लाख रुपयांपेक्षा अधिक नसेल इतक्या रकमेच्या दंडाची तरतूद आहे. याशिवाय, असा प्रकार आढळल्यास नागरिकांनी तक्रार करण्यासाठी महापालिकेकडून हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला असून, नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

येथे करा तक्रार

विनापरवाना वृक्षतोडीचे प्रकार घडत असल्यास अथवा घडलेले असल्यास नागरिकांना तत्काळ महापालिकेशी संपर्क साधण्यासाठी हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याअंतर्गत नागरिक १८००१०३०२२२ या टोल फ्री क्रमांकावर, ९६८९९००००२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर तक्रार करू शकतात, तसेच ९६८९९३८५२३, ९६८९९३००२४ या मोबाइल क्रमांकावरही तक्रार करता येणार आहे.

Web Title: Pune Municipal Corporation warns of fine of Rs 1 lakh for cutting down trees for Holi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.