भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर..., पुणे महापालिकेत सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 15:59 IST2022-03-15T15:59:06+5:302022-03-15T15:59:20+5:30
पुणे : एरवी ताणतणाव, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, प्रश्नोत्तरे याऐवजी महापालिकेच्या सभागृहाने खेळीमेळीचे, भारावलेले, मैत्रीपूर्ण वातावरण अनुभवले. पंचवार्षिक कारकिदीर्तील शेवटच्या सभेसाठी ...

भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर..., पुणे महापालिकेत सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र
पुणे : एरवी ताणतणाव, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, प्रश्नोत्तरे याऐवजी महापालिकेच्या सभागृहाने खेळीमेळीचे, भारावलेले, मैत्रीपूर्ण वातावरण अनुभवले. पंचवार्षिक कारकिदीर्तील शेवटच्या सभेसाठी उपस्थित असलेले १०० हून अधिक सभासद...सेल्फी काढण्यासाठी सरसावलेले स्मार्ट फोन...पुणेरी पगडी घालून मिरवणारे नगरसेवक...‘मतभेद असले तरी मनभेद असू नये’ हा संदेश देणारे आणि मिश्कील टिप्पणी करणारी भाषणे...काहींना भावना व्यक्त करताना अनावर झालेले अश्रू....अशा प्रसंगात सोमवारची सायंकाळ रंगली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांना अभिवादन करत सभागृहात ‘मन की बात’ केली.
पुणे महापालिकेची शेवटची सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली. निवडणुका लांबल्याने मंगळवारपासून महापालिकेची सत्ता आता आयुक्तांच्या हाती जाणार आहे. आपापल्या प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी एरव्ही आक्रमक होणाऱ्या नगरसेवकांनी पाच वर्षांच्या आठवणींना आणि प्रवासाला उजाळा दिला. महापालिका म्हणजे अनेक विषय शिकवणारे विद्यापीठ असल्याची भावना सभासदांनी व्यक्त केली. महापालिकेतील पहिला दिवस ते अनुभवाच्या जोरावर सभागृहात प्रश्न मांडण्यासाठी हिरिरीने घातलेला सहभाग हा आत्मविश्वास येथे मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पक्षीय भेदाभेद न बाळगता सर्वच पक्षांमधील अनुभवी नेत्यांच्या भाषणातून खूप काही शिकायला मिळाल्याचे सर्वांनीच अधोरेखित केले. अजय खेडकर, अजय दरेकर, आदित्य माळवे, प्रवीण चोरबेले आदींनी मनोगत व्यक्त केले.
''हेतू चांगला असेल तर काम करण्याची संधी मिळतेच; नवीन सभागृह तयार होत असताना ज्येष्ठ सभासदांवर जबाबदारी होती. स्थायी समितीमध्ये काम करण्याचा अनुभव गाठीशी होता. सभागृह नेता म्हणून शहरातील मोठ्या प्रकल्पांचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली. आज सभागृहाचा शेवटचा दिवस असला तरी आजपासून खरी सुरुवात आहे. आजपासूनचा कठीण काळ सर्वांना सुखद जावो, अशीच इच्छा आहे असे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सांगितले.''
''आई आणि मुलगा एकाच सभागृहात निवडून येण्याचे भाग्य लाभले. बाजूच्या हॉटेलमध्ये बसून महापौर होण्याचे स्वप्न पाहिले, ते पूर्णही झाले. सायकलवर फिरणाऱ्या कार्यकर्त्याला त्याच रस्त्यावरून महापौर म्हणून लाल दिव्याच्या गाडीतून फिरण्याची संधी मिळाली. सत्ताकेंद्र कोणतेही असले तरी लोकप्रतिनिधी म्हणून काम करणे आपले कर्तव्य असते. मी मी म्हणणाऱ्यांना लोक अद्दल घडवतात. आपल्यातील काही जण परत निवडून येतील, काहींना परतीचा नारळ मिळेल असे नगरसेवक प्रशांत जगताप यांनी सांगितले.