महापालिकेकडून पाणीपट्टीचे २०० कोटी जलसंपदाला जमा; एकूण पाणीपट्टी ४२२ कोटींची, आठ वर्षांतील सर्वाधिक

By नितीन चौधरी | Updated: April 5, 2025 16:20 IST2025-04-05T16:20:31+5:302025-04-05T16:20:45+5:30

विभागाला मार्चअखेर पाणीपट्टीपोटी ४२२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे

pune Municipal Corporation deposits Rs 200 crore of water tax to water resources; | महापालिकेकडून पाणीपट्टीचे २०० कोटी जलसंपदाला जमा; एकूण पाणीपट्टी ४२२ कोटींची, आठ वर्षांतील सर्वाधिक

महापालिकेकडून पाणीपट्टीचे २०० कोटी जलसंपदाला जमा; एकूण पाणीपट्टी ४२२ कोटींची, आठ वर्षांतील सर्वाधिक

पुणे :पाणीपट्टी भरा, अन्यथा पाणीकपात करू, असा इशारा जलसंपदा विभागाने दिल्यानंतर महापालिकेने नमती भूमिका घेत २०० कोटी रुपयांची थकबाकी जमा केली. जलसंपदा विभागाची महापालिकेकडे ७१४ कोटी रुपयांची थकबाकी असून, महापालिकेकडे अजूनही ५०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. दरम्यान, विभागाला मार्चअखेर पाणीपट्टीपोटी ४२२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. गेल्या आठ वर्षांमधील हा सर्वाधिक महसूल असल्याचे खडकवासला प्रकल्पाच्या कार्यकारी संचालक श्वेता कुऱ्हाडे यांनी सांगितले.

महापालिकेकडे जलसंपदा विभागाची सुमारे ७१४ कोटी रुपयांची पाणीपट्टीसह दंडाची थकबाकी होती. थकबाकी वसुलीसाठी जलसंपदा विभागाने दोनदा महापालिकेला स्मरणपत्र पाठविले होते. त्यानंतर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतही याबाबत चर्चा झाली. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीसुद्धा पाणीपट्टी भरा, अन्यथा कपात करावी लागेल, असा इशारा दिला होता. याच बैठकीत अखेर महापालिका आयुक्तांनी काही रक्कम भरण्याची तयारी दाखविली होती. त्यानुसार पुणे महापालिकेने ७१४ कोटींपैकी २०० कोटी रुपयांची रक्कम भरली. अजूनही सुमारे पाचशे कोटींहून अधिक थकबाकी आहे. महापालिकेने दंडाची रक्कम भरण्याची तयारी दाखविली असल्याचे कुऱ्हाडे यांनी सांगितले.

जलसंपदा विभागाच्या खडकवासला प्रकल्पांतर्गत २०२४-२५ या आर्थिक वर्षात पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीसाठी पाणी पुरविले. या पाणीपट्टीपोटी जलसंपदा विभागाने आतापर्यंत गेल्या आठ वर्षांतील विक्रमी वसुली केली आहे. सिंचनासह बिगरसिंचनासाठी पाणीपुरवठा केल्याने पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेसह अन्य विभागांकडून ४२२ कोटी ४५ लाख ६७ हजार रुपयांची वसुली झाली. यात बिगरसिंचनासाठी ४१८ कोटी ३८ लाख रुपयांची वसुली (११५ टक्के) केली आहे. सिंचनाला केलेल्या पाणीपुरवठ्याद्वारे ४ कोटी ९ लाख म्हणजेच १०९ टक्के वसुली केली. सिंचनासाठी ३ कोटी ७५ लाख रुपयांचे उद्दिष्ट होते. त्या तुलनेत ४ कोटी ७ लाख सहा हजारांची वसुली झाली. तसेच बिगरसिंचनासाठी ३६२ कोटी ३९ लाख रुपयांचे उद्दिष्ट असताना ४१८ कोटी ३८ लाख ६१ हजार रुपयांची वसुली झाली आहे.

मुठा विभागांतर्गत सिंचनासाठी ५२ कोटींचे उद्दिष्ट असताना ५२ कोटी ५१ लाख रुपये वसूल करण्यात आले. गेल्या पाच वर्षांतील ही सर्वाधिक वसुली ठरली आहे. बिगरसिचंनासाठी २४४ कोटी ५१ लाख रुपयांची वसुली करण्यात आली असून, त्यात सर्वाधिक वसुली ही पुणे महापालिकेकडून करण्यात आली आहे. बिगरसिंचन विभागात पाणीपट्टी वसुलीत पुणे शाखा अव्वल स्थानी ठरली आहे. पवना उपविभागाचे सिंचनाचे उद्दिष्ट ६५ लाख होते. त्या विभागाकडून सुमारे ९१ कोटींची वसुली करण्यात आली. १३९ टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले. गेल्या पाच वर्षांमध्ये ही वसुली सर्वाधिक ठरली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सुद्धा ६५ कोटी रुपयांची पाणीपट्टी भरली आहे.

 
पाणीपट्टी (रक्कम कोटींत)

वर्ष........................ सिंचन............ बिगरसिंचन ........ एकूण

३१ मार्च २०२२ ..........३१२.०३................१५८७८.८२............१६१९०.८५

३१ मार्च २०२३ .........३१४.७३............२२३९३.८२..............२२७०८.५५

३१ मार्च २०२४ .............३४१.८३...............३३४६५..........३३८०६.८३

३१ मार्च २०२५................४०७.०६............४१८३८.६१............४२२४५.६७

पाणी कपातीचा इशारा आणि थकबाकी भरण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे महापालिकेने २०० कोटींची रक्कम भरली आहे. त्यामुळे खडकवासला प्रकल्पांतर्गत आतापर्यंत ४२२ कोटी ४५ लाख रुपयांची वसुली ही सर्वाधिक ठरली आहे.

-श्वेता कुऱ्हाडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला प्रकल्प

Web Title: pune Municipal Corporation deposits Rs 200 crore of water tax to water resources;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.