पुणे : महापालिकेच्या बांधकाम आणि अतिक्रमण विभागाने सोमवारी शहरातील वडगाव बुद्रुक, धायरी, आंबामाता मंदिर परिसर, कात्रज तसेच कळस-धानोरी या भागांतील अनधिकृत बांधकाम आणि शेड अशा अतिक्रमणांवर कारवाई करून २७ हजार ७०० चौरस फूट क्षेत्रफळ मोकळे केले.
महापालिका हद्दीत समावेश झालेली गावे आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आणि शेड उभे करून त्याचा निवासी आणि व्यावसायिक वापर केला जात आहे. यामुळे रस्ते, नाले, मोकळी जागा तसेच आराखड्यातील सार्वजनिक सुविधा बाधित होत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार महापालिकेच्या बांधकाम आणि अतिक्रमण विभागाने उपआयुक्त सोमनाथ बनकर आणि मुख्य सुरक्षा अधिकारी तथा सहायक विभागप्रमुख डॉ. रमेश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेंतर्गत सोमवारी वडगाव बुद्रुक, धायरी, आंबामाता मंदिर परिसर, कात्रज तसेच कळस-धानोरी या भागांतील अनधिकृत बांधकाम आणि शेड अशा अतिक्रमणांवर कारवाई करून २७ हजार ७०० चौरस फूट क्षेत्रफळ मोकळे केले. ही कारवाई सात जेसीबी, सात गॅसकटर आणि आठ ब्रेकर, दोन अतिक्रमण निरीक्षक, सहायक निरीक्षक तसेच २८ बिगारी यांच्यासह पोलिस दलातील १७ कर्मचारी तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे २५ जवानांच्या माध्यमातून करण्यात आली.