पुण्यातील मेट्रो स्टेशन 'रामभरोसे'!काही अपघात झाला तर जबाबदार कोण? जनतेचा प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 13:19 IST2025-11-16T13:18:55+5:302025-11-16T13:19:04+5:30
- रामवाडी, कल्याणीनगर व येरवडा मेट्रो स्टेशनची पाहणी : कोणालाही सहज मिळतो प्रवेश; काही अपघात झाला, तर जबाबदार कोण? जनतेचा प्रश्न पीएमपी, एसटी, रेल्वे, मेट्रो स्थानकांबाहेर सुरक्षा वाऱ्यावर लाखो प्रवाशांची वर्दळ असूनही केवळ आतील भागात सीसीटीव्ही; बाहेरील परिसरात मोकळे रान

पुण्यातील मेट्रो स्टेशन 'रामभरोसे'!काही अपघात झाला तर जबाबदार कोण? जनतेचा प्रश्न
- अंबादास गवंडी
पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या कणा असलेल्या पीएमपी, एसटी, रेल्वे मेट्रो स्थानकांबाहेर कायम प्रवाशांची गर्दी असते. दरराेज लाखो प्रवासी यातून प्रवास करतात. परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक याची कमतरता आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, राजधानी दिल्लीत दोन दिवसांपूर्वी झालेल्या बाॅम्बस्फोटामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुण्यात नोकरी, व्यवसाय आणि कामानिमित्त राज्य आणि राज्याबाहेरील लाखो नागरिक राहतात. यामुळे पीएमपी, एसटी, मेट्रो, रेल्वेतून लाखो नागरिक प्रवास करतात. यामुळे बसस्थानक परिसर, रेल्वेस्थानक परिसरात, मेट्रो स्थानकाबाहेर, शिवाय डेक्कन, कात्रज, हडपसर, शिवाजीनगर या ठिकाणी असणाऱ्या पीएमपी स्थानकांत सीसीटीव्ही यंत्रणांची कमतरता आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे काही अघटित दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी स्थानक परिसरातील आतील भागासह बाहेरील परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा लावण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
स्वारगेट, शिवाजीनगर बसस्थानक :
स्वारगेट बलात्कार प्रकारणानंतर स्वारगेट, शिवाजीनगर बसस्थानक परिसरातील आतील भागात सीसीटीव्ही बसण्यात आले परंतु बाहेरील भागात अद्याप सीसीटीव्ही बसवले नाहीत. त्यामुळे गर्दीच्या वेळी स्थानकाच्या बाहेरील भागात काही दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी बाहेरील परिसरात सीसीटीव्ही लावणे, सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. स्वारगेट, शिवाजीनगर आगारांतून दिवसरात्र एसटी सेवा सुरू असते. त्यामुळे बसस्थानकांत कायम प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे एसटी प्रशासनाकडून सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
पीएमपी बसस्थानक आणि थांबा
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमधून दररोज १० लाखांहून अधिक नागरिक प्रवास करतात. परंतु डेक्कन, कात्रज, हडपसर, स्वारगेट, शिवाजीनगर व मध्यवर्ती भागात प्रवाशांची वर्दळ असूनही पीएमपी डेपो आणि प्रमुख बसथांब्यांवर सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना केली नाही. दरराेज दहा लाखांहून अधिक प्रवासी असूनदेखील प्रवाशांच्या सुरक्षेकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. शिवाय अनेक पीएमपी स्थानकांत गर्दुल्यांचा खुलेआम वावर असतो. त्यामुळे महिला, ज्येष्ठांना गैरसोयीचा सामना करावा लागतो.
पुणे रेल्वे स्टेशन :
पुणे स्थानकावरून दररोज दीड ते दोन लाख नागरिक प्रवास करतात. त्यामुळे येथे कायम वर्दळ असते. रेल्वे स्थानकावरील आतील भागात अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा लावण्यात आली आहे परंतु बाहेरील बाजूस सीसीटीव्हींची संख्या कमी आहे. शिवाय आरपीएफकडे मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे स्थानक परिसरात सुरक्षा यंत्रणा कमी पडत आहे. फलाटवर जागा कमी असल्याने व्हरांड्यात हजारो प्रवासी बसतात. शिवाय प्रवासी बॅग तपासणी यंत्रणा असूनदेखील ये-जा करण्यासाठी दरवाजे जास्त असल्याने अनेक ठिकाणांवरून प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे उपलब्ध सुरक्षा यंत्रणा कुचकामी ठरत आहे.
मेट्रो स्टेशन :
महामेट्रोकडून मेट्रो स्टेशनवर प्रत्येक स्थानकांत सीसीटीव्ही यंत्रणा, सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे. परंतु काही मेट्रोबाहेर सीसीटीव्ही उपलब्ध नाही. शहरातील अनेक मेट्रो स्थानक परिसरात प्रवासी खेचण्यासाठी रिक्षांची वर्दळ असते. यामुळे काही वेळा वाहतूककोंडीदेखील होते. स्वारगेट ते पीसीएमसी आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गांवर मेट्रोला दिवसेंदिवस प्रवासी संख्या वाढत आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा वाढविण्यासाठी आवश्यक आहे. तसेच स्वारगेट, सिव्हिल कोर्ट या ठिकाणी प्रवाशांची गर्दी जास्त असते. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकांची आणखी संख्या वाढविणे आवश्यक आहे.